पती जखमी, फरासखाना हद्दीतील घटना
marathinews24.com
पुणे – पती-पत्नीमधील कौटुंबिक वादादरम्यान झालेल्या गोळीबारात ३० वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास फरासखाना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या खांद्याजवळ गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांना घटनास्थळी रक्ताचे डाग, पिस्तूल, एक काडतूस सापडले आहे. पिस्तूल कोणाचे होते, ते कुठून मिळवले होते, गोळीबार का केला, याचा पोलीस आता तपास करत आहेत.
पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत आणि त्यांची पत्नी मूळचे श्रीरामपूरचे असून, त्यांचे लग्न २०१६ मध्ये झाले. अभिजीत पुण्यात मोबाईल दुरूस्तीचे दुकान चालवतो, तर त्याची पत्नी वकील आहे. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. काही दिवसांपासून त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र, अभिजीत हा पत्नीला घटस्फोटाची प्रक्रिया रद्द करण्यास सांगत होता. सोमवारी सकाळी दोघांत वाद झाला. त्याचवेळी गोळीबार केल्यामुळे अभिजीतच्या खांद्याजवळ गोळी लागली. माहिती मिळताच फरासखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले, परंतु शिंगोटे दाम्पत्य तिथे नव्हते.
जखमी अभिजीतला उपचारासाठी आधीच रुग्णालयात नेण्यात आले होते. पोलिसांनी घराची झडती घेतली असता रक्ताचे डाग आढळले. एक पिस्तूल, एक रिकामे काडतुस जप्त केले. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमधील फुटेजचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे घरी भांडण झाले. घटनेच्या वेळी दोघेही तिथे उपस्थित होते. अभिजीतच्या खांद्याजवळ गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पिस्तुलातून गोळी कोणी झाडली, याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.























