वाल्हेकरवाडी येथे कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उत्सवाचा आनंद घेताना सायबर गुन्हे, (Cyber Safety LokSamvad) अमली पदार्थांचे सेवन तसेच विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे, गणेश मंडळे, युवक आणि नागरिकांनी सुरक्षित व जबाबदार गणेशोत्सवासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निखिल वाघोले यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हेकरवाडी येथे ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकसंवाद’ (Cyber Safety LokSamvad)उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक निखील वाघोले, चिंतामणी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश आहेर, निशिगंधा गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकरराव सावंत तसेच पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
वाघोले म्हणाले, सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लिंक, क्यूआर कोड, मोबाईल ॲप किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये. ओटीपी, एटीएम पिन, सीव्हीव्ही, पासवर्ड तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. सोशल मीडियावरून येणाऱ्या आकर्षक ऑफर्स, बनावट सरकारी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी म्हणून होणारे फोन तसेच ‘डिजिटल अटक’ यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून नागरिकांनी सावध रहावे. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
गणेशोत्सवाच्या काळात युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. (Cyber Safety LokSamvad) अमली पदार्थांचे सेवन आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकते. ‘एकदा करून पाहू’ या मानसिकतेपासून दूर राहून अमली पदार्थांना ठामपणे नकार द्यावा. व्यसनाधीन व्यक्तीला हिणवण्याऐवजी त्याला योग्य समुपदेशन व उपचारासाठी मदत करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
गणेश मंडळांनीही आपल्या मंडप परिसरात ‘सायबर सुरक्षा’, ‘अमली पदार्थांना नकार’ आणि ‘व्यसनमुक्त समाज’ याबाबत जनजागृतीपर फलक, संदेश व उपक्रम राबवावेत. उत्सवाच्या काळात अफवा, अप्रमाणित संदेश किंवा आक्षेपार्ह माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
‘उत्सव गणरायाचा… संकल्प सुरक्षित समाजाचा!’ या भावनेतून नागरिकांनी सायबर सुरक्षितता, व्यसनमुक्ती आणि कायदा-सुव्यवस्थेला सहकार्य करून शांततामय व सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वाघोले यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन उपसंपादक संदीप राठोड, जितेंद्र खंडागळे आणि विशाल तामचीकर यांनी केले.






















