जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि वैशिष्ट्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, प्रथा आणि आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृती – सविस्तर बातमी
आपल्या बाप्पाची कथा जगासमोर मांडा
पुणे जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गणेशोत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. अनेक कुटुंबे, गाव आणि गणेश मंडळे पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक प्रथा, आरत्या आणि उत्सवाची वैशिष्ट्ये जपत आहेत. या परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ हे प्रभावी माध्यम ठरू शकते.
आठवणी, परंपरा आणि पाककृतीही करता येणार शेअर
‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, पारंपरिक प्रथा, आरत्या, छायाचित्रे, नैवेद्य व पाककृती तसेच उत्सवाशी संबंधित सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती नोंदविता येणार आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे ध्वनिचित्रमुद्रण, गणेशोत्सवाची छायाचित्रे, पारंपरिक नैवेद्य व पाककृती तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विशेष परंपरांची माहितीही नागरिक या माध्यमातून शेअर करू शकतात.
“आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा ‘Bappa.org’च्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात. आपल्या बाप्पाशी जोडलेल्या आठवणी, श्रद्धा आणि परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.






















