पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी पदावर नोकरीचे आमिष; सहा जणांची १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – Pune Municipal Corporation Job Fraud : महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने सहा जणांची १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. संतोष वाल्हेकर (वय ४० रा. नायडू रुग्णालय परिसर, बंडगार्डन रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन बबन भालेराव (वय ४३, रा. जगतापनगर, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दौंडमधील खून प्रकरणाचा छडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपीशी गेल्या वर्षी ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदारासह त्याच्या मित्रांना पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराला ढोले पाटील रस्ता परिसरात भेटण्यास बोलाविले. त्यानंतर आरोपीने वर्षभरात तरुणासह त्याच्या मित्रांकडून वेगवेगळी कारणे सांगून रोख स्वरुपात १३ लाख ७२ हजार रुपये घेतले. नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदारासह त्याच्या मित्रांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.




















