भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनचा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात
marathinews24.com
पुणे – ऋतूगंध’ संगीताविष्काराने रसिक मंत्रमुग्ध – भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन आणि ‘आरंभ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऋतूगंध’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार, दि. १२ जुलैला सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. सहा ऋतूंच्या सान्निध्यात निर्माण होणाऱ्या संगीतसौंदर्याची सुरेल मांडणी या कार्यक्रमातून करण्यात आली. ऋतूंशी संबंधित निवडक कविता, संवाद आणि मराठी-हिंदीतील सुरेल गीतांचा मनोहारी संगम यावेळी रसिकांना अनुभवता आला. कार्यक्रमाच्या संकल्पना, संहिता आणि निर्मिती शीतल दामले यांची होती. सूत्रसंचालन शीतल दामले व चिंतामणी केळकर यांनी संयतपणे केले.
पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती – सविस्तर बातमी
गायक कलाकारांमध्ये शेखर केंदळे,मीनल केळकर,समीर चिटणीस आणि प्रतिभा देशपांडे यांनी विविध ऋतूंना साजेशी गीते सादर करून श्रोत्यांना मोहिनी घातली. साथसंगत वाद्यवृंदात समीर बंकापुरे (तबला), प्रसन्न बाम (हार्मोनियम), किमया काणे व चिन्मय कुलकर्णी (सिंथेसायझर) आणि आदित्य आपटे (साईड रिदम) यांनी कलाकारांना उत्तम साथ दिली.भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे,डॉ.सतीश देसाई यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.सुरेश(काका) धर्मावत,रवी चौधरी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘सूर निरागस हो’ ने कार्यक्रमाची सुरुवात झाली.’केतकी, गुलाब,जुही’,’मोगरा फुलला ..’,’नभ उतरू आलं..’,’गरजत, बरसत सावन आयोरे …’,’धुंदी कळ्यांना’,’थंडी हवाये , लेहेराके आये’,’मस्ती भरा ये समा’ अशी एकाहून एक बहारदार गीते प्रभावीपणे सादर करण्यात आली.या सादरीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा २५२ वा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाला विविध मान्यवर, रसिक आणि संस्कृतीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवेश विनामूल्य होता.अनेक संगीतप्रेमींना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.























