तरुणाची प्रकृती गंभीर; नगर रस्त्यावरील घटना
marathinews24.com
पुणे – जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात गुरुवारी रात्री घडली. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचाा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरटेकडून एक कोटी वीस लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी
सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जमिनीचा वाद सोडविण्यासाठी सुशील हा त्यांचे चुलत भाऊ दत्ता ढोरे यांच्याबरोबर वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री गेला होता. आरोपी सचिन आणि दत्ता यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता होता. वादात सुशीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी सचिन त्याच्यावर चिडला. सचिनकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. वादातून त्याने त्याच्याकडील बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून सुशीलवर गोळीबार केली. पिस्तुलातून सुटलेली गोळी सचिनच्या छातीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली.
सचिन याच्याकडून बेकायदा बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. आरोपी सचिन याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी रात्री उशीरा आरोपी सचिन ढोरे, भिवराज हरगुडे यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार गणेश हा पसार झाला आहे. आरोपीने बेकायदा बाळगलेले पिस्तूल कोणाकडून आणले ? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी दिली.























