पुणे पोलीस उपआयुक्तांचा आदेश
marathinews24.com
पुणे – गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल जलस्त्रोतामधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या मुर्त्यांचे छायाचित्रण करू नका. धार्मिक भावना दुखावतील व सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे सोशल मीडियावर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठची मिरवणूक – सविस्तर बातमी
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश पोलीस उपआयुक्त, व कार्यकारी दंडाधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. विसर्जनानंतर गणेश मुर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन व प्रसारण यावर बंदी घालण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अंमलात राहील. आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत आहे. स्थानिक वृत्तपत्रांद्वारेही प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.






















