सायबर चोरट्यांची नवीन युक्ती, नागरिकांच्या लुटमारीचे पेव
marathinews24.com
पुणे – सीबीआय ऑफिसरसह पोलीस असल्याची बतावणी करीत ट्रॅपद्वारे सायबर चोरट्यांनी नागरिकांना घेरले आहे. नागरिकांना जाळ्यात अडकवून ऑनलाईनरित्या लुटीचे पेव फुटले असून, प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांना अटकेची भीती दाखवून त्यांचे बँकखाते रिकामे केले जात आहे. तुमच्या नावाचे आधारकार्डचा गैरवापर सुरू आहे. आम्ही तुम्हाला अटक करू शकतो, केस क्लेअर करण्यासाठी बँकखात्याची तपासणी करावी लागेल, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले जात आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन लुटीच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
युद्धात हिंसाचार हे उत्तर असू शकत नाही- माजी लष्करप्रमुख डॉ मनोज नरवणे – सविस्तर बातमी
अधिकार्यांच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून वापरण्यात येणार्या युक्तीमुळे अनेकजण जाळ्यात अडकत आहेत. क्राईम ब्रॉन्च दिल्ली आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची बतावणीला बळी पडून लाखो रूपये वर्ग करण्याच्या घटना घडत आहेत. सायबर चोरट्यांकडून संबंधिताची सुरूवातीला संपुर्ण माहिती काढून घेतली जाते. त्यानंतर तुमचे आधारकार्ड अमूक-तमूक शहरात वापरले असून, त्याचा गैरवापर झाला आहे. मनी लॉड्रींगसह ह्युमन ट्राफिकिंगसाठी आधारकार्डचा वापर झाला आहे. याप्रकरणी तुम्हाला केव्हाही अटक होउ शकते, असे धमकाविले जात आहे. तुमच्या बँकखात्याची चौकशी करावी लागेल, अशी थाप मारून ऑनलाईन लुटीचे जाळे टाकले जात आहे. घाबरलेल्या नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता बँकखात्याची गोपनीय माहितीसह रक्कम स्वतःहून वर्ग केली जात आहे. त्यानंतर मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चातापाची वेळ येत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.
पुण्यात अशाच पद्धतीने फसवणूकीच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची बतावण करीत सायबर चोरट्याने तरूणाला ४ लाख ६५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ ते १८ सप्टेंबर २०२४ कालावधीत वारजे माळवाडीत घडली आहे. तक्रारदार तरूण वारजे माळवाडीत राहायला असून, १७ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्याला फोन केला. क्राईम ब्रॉन्च दिल्ली आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची बतावणी केली. तक्रारदार तरूणाच्या आधारकार्डचा गैरवापर करून सीमकार्ड खरेदी केले आहे. त्याचा वापर ह्युमन ट्राफिकिंंगसाठी केला जात असल्याचे सांगून सायबर चोरट्याने तरूणाला अटक करण्याची धमकी दिली. सर्व केस क्लिअर करण्यासाठी एनओसी प्रमाणपत्र देतो असे सांगत बँक खात्यातील ४ लाख ६५ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले.
पोलीसाची बतावणी पडली २१ लाखांना
पोलीस असल्याची बतावणी करीत एकाने जेष्ठ महिलेला फोन करून त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती दिली. नाशिकमध्ये आधारकार्डद्वारे अकाउंट काढून त्याचा वापर मनी लॉड्रींगसाठी केल्याची बतावणी केली. त्यानंतर बँक खात्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील तब्बल २१ लाख ६५ हजार रूपये आरोपीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून फसवणूक केली आहे. ही घटना ८ फेबु्रवारी ते १ मार्च कालावधीत सीटी क्राउन बिल्डींग कर्वेनगरमध्ये घडली आहे. नमिता लळीगकर (वय ७६ रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजय पिसे नावाच्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार जेष्ठ महिलेला ८ फेबु्रवारीला त्यांना संजय पिसे असे नाव सांगत एकाने स्वतः पोलीस असल्याची बतावणी केली. महिलेच्या आधारकार्डचा वापर करून एकाने नाशिकमध्ये अकाउंट उघडले असल्याचे सांगितले. त्या अकाउंटचा वापर मनी लॉड्रींगसाठी झाल्याचे सांगून २१ लाख ६५ हजार रूपये भरण्यास सांगून फसवणूक केली आहे.
केसमध्ये गुंतवणूकीच्या धमकीने अडीच लाखांना गंडा
तुमच्या नातेवाईकांच्या मुलाला बलात्काराच्या केसमध्ये पकडले असून, आम्ही त्याला बेदम मारले आहे. तो सध्या बोलण्याच्या स्थितीत नसून, तुमच्या नाव एफआयअमध्ये येउ द्यायचे नसेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करीत तोतया पोलीस अधिकार्याने एकाला नुकताच अडीच लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर चोराविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजीटल अटक, सीबीआय पोलीसाचे नावाने भूलथापा
आधारकार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी करीत साबयर चोरट्यांकडून नागरिकांना घाबरवले जात आहे. सीबीआय अधिकारी व पोलीस असल्याची बतावणी करीत ऑनलाईन रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले आहे. मात्र, नागरिकांनो अशाप्रकारे जर तुम्ही काहीच गुन्हा केला नसेल तर सीबीआय अधिकारी किंवा दिल्ली पोलीस नोटीस दिल्याशिवाय अटकेची काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका, अनोळखी कॉलला उत्तर देउ नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे. तुम्हाला जर सातत्याने अनोळखी क्रमांकावरून फोन कॉल येत असतील तर ते टाळणे आवश्यक आहे. अन्यथा सायबर चोरट्यांकडून तुम्हाला विविध प्रकारची भीती दाखवून ऑनलाईनरित्या लुट केली जाउ शकते.