मुख्य कट रचणाऱ्याला अटक, पिस्तूल व काडतुस जप्त
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पहिल्या स्मृतिदिनीच खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या आणि खराडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस असा ४१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मुठा कॉलनी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेचे युनिट दोन पोलीस अधिकारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी चारनळ सुतारदरा, कोथरूडमध्ये सापळा रचून ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मुठा कॉलनी, पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी ५ जानेवारी २०२५ मध्ये कट रचला होता. त्यासाठी पिस्तुल खरेदी करून हल्ला करणार होता. मात्र पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीचा डाव उधळून लावत दोघांना अटक केली होती.
तेंव्हापासून मोरे पसार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी ओंकार मोरे हा खराडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ०३/२०२५ (बीएनएस कलम १११, ६१(ब) व आर्म अॅक्ट ३(२५)) मधील पाहिजे आरोपी आहे. त्याच्याकडून ४०,८०० रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण नागेश राख यांनी केली