टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू – रस्ता ओलांडताना भीषण अपघात
marathinews24.com
पुणे – रस्ता ओलांडत असलेल्या तरूणाला टेम्पो चालकाने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ५ मे ला रात्री अकराच्या सुमारास पुणे-सासवड रस्त्यावरील १० वा मैल वडकीत घडला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज केशव बापमारे (वय २१ रा. खळवट ता. वडवणी, बीड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश आगे ( वय २९ रा. वलवा वस्ती, वडकी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेशच्या मामाचा मुलगा सुरज बापमारे हा बीडहून पुण्यातील वडकी परिसरात आला होता. ५ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास तो पुणे-सासवड रस्त्यावरील १० वा मैल वडकीत रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सुरजला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
रविवार ठरला होता अपघात वार
पुण्यात रविवार (दि.४) अपघात वार ठरल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात दोन महिलांसह तरूणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे अपघात मांजरी हडपसर, कात्रज बायपास, शास्त्रीनगर चौक येरवडा परिसरात घडले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी चालकांसह अपघाताला कारणीभूत ठरलेल्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या अपघातात भरधाव कॉक्रीट मिक्सर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सहप्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ४ मे रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मांजरी परिसरातील झेड कॉर्नरसमोर घडला आहे. रेणू ब्रम्हशंकर शिवप्रताप पांडे (वय ३८ रा. केशवनगर ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.