पुणे पुस्तक महोत्सवात सुनीताराजे पवार यांनी साधला संवाद
marathinews24.com
पुणे – भगवान गौतम बुद्ध, संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज, जगत्गुरू तुकाराम महाराज तसेच शाहु-फुले-आंबेडकर यांच्या वैचारिक लेखनाचा प्रवाह क्षीण होताना दिसू लागल्यामुळे तिसरी विवेकवादी भूमिका लेखनातून मांडण्यास सुरुवात केली, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या २३व्या पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रकट मुलाखतीचे आज (दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. लेखनासाठी मिळालेली प्रेरणा, सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतील योगदान, लेखनातू मांडलेले वेगळे प्रवाह येथपासून ते भविष्यातील साहित्य निर्मितीवर पवार यांनी डॉ. सबनीस यांना बोलते केले. सेंट्रल पार्क, आपटे रोड येथे पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
निर्भयता, धाडस हे गुण वडिलांकडून शिकायला मिळाले, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, जातीव्यवस्थेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या भूमिकेला अनुसरून विद्यार्थी दशेपासून वाटचाल सुरू केली. प्रत्येक समाजात जातीवाद आहे. महापुरुषांचे विचार, तत्त्वज्ञान बंदिस्त राहिले, एकाच ठिकाणी साचून राहिले तर त्यालाही दुर्गंधी येते. त्यामुळे ते विचार, तत्त्वज्ञान वाहत्या पाण्यासारखे राहिले पाहिजे या भूमिकेतून नवहिंदुत्ववादाची मांडणी केली. सत्य हा संस्कृतीचा गाभा आहे. विकासासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे विविध माध्यमांद्वारे लोकल्याणाच्या भूमिका मांडत आलो. महापुरुषांच्या विचारात जसे सामर्थ्य होते त्याच प्रमाणे त्यांच्यात मर्यादाही होत्या हेही मांडण्याचा प्रयत्न केला.
संवाद आणि संघर्ष लेखनाचे सूत्र..
ते पुढे म्हणाले, महापुरुषांमधील सामर्थ्य आणि मर्यादा मांडताना अनेकांशी शत्रुत्व आले. सत्य मांडताना अभ्यासात मर्यादा असून चालत नाही. संवाद आणि संघर्ष हे आपल्या लिखाणाचे सूत्र असल्याचे ते म्हणाले.
मराठी भाषेसाठी प्रत्येकाचे योगदान..
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, ८९व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. त्यावेळी पूर्वीच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या लेखनाचा विचार केला तेव्हा असे जाणवले की, इतर जाती-धर्मातील लेखनप्रवाहाविषयी अढी कायम आहे. मराठी भाषा टिकविण्यात प्रत्येक जाती-धर्मातील मराठी बोलणाऱ्या व्यक्तीचे योगदान आहे. वैचारिक भूमिकेतून सांस्कृतिक एकात्मता सिद्ध करासाठी लेखन करत आलो.
राजकारणी देशाचे मारेकरी..
महापुरुषांनी मानवाचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी कल्याण हेच त्यांचे साध्य होते. कलावंतांनी कलेच्या रुपाने, साहित्यिकांनी साहित्याद्वारे, राजकारण्यांनी मानवी कल्याणासाठी राजकारणाचा वापर करावा, असे अपेक्षित असताना राजकीय व्यवस्था सत्तेला सत्य, सर्वस्व मानत आली, त्यामुळे राजकारण्यांनी देशाचे वाटोळे केले आहे. ते संस्कृतीचे मारेकरी आहेत. त्यामुळे राजकीय शुद्धीकरण महत्त्वाचे वाटते, सांस्कृतिक लोकशाही येणे आवश्यक वाटते, अशी अपेक्षा डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत पी. एन. आर. राजन यांनी केले.



















