तबला वादक अनिरुद्ध शंकर यांच्या साथीनं झाली सुरांची जुगलबंदी
marathinews24.com
पुणे – तंतुवाद्यातील वैशिष्ट्यपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरोद वादनातून उमटलेले राग शामकल्याणचे बोल, राग जोग आणि राग किरवाणी यांच्या सादरीकरणातून रसिकांची सायंकाळी सुरमय झाली. निमित्त होते पुण्यातील सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांच्या वादन मैफलीचे. कला अनबॉक्स या अंतर्गत या मैफलीचे आयोजन कर्वे रोड येथील द बॉक्स येथे करण्यात आले होते.
भाजपकडून ‘पालावरील दिवाळी’ उपक्रम – सविस्तर बातमी
अनुपम जोशी यांनी आपल्या वादनाच्या सुरुवातीस मैहर अंगाने जाणाऱ्या शाम कल्याण रागाचे वैशिष्ट्य दर्शवित आलाप, जोड, झाला प्रस्तुत करून रसिकांना मोहित केले. त्यानंतर तंतुवाद्य प्रकारात वाजविली जाणारी मासिदखानी गत सादर केली. यात सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांनी साडेचार मात्रांचा मुखडा असलेली अनोखी पद्धत मांडली आहे. ती दर्शविताना अनुपम जोशी यांनी राग जोगमधील तीन तालातील विलंबित व मध्यलयीतील सुमधुर रचना ऐकविली.
सरोद वाद्याचे जनक समजल्या जाणाऱ्या रबाबच्या अंगाने राग किरवाणी सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. बोलकारी पद्धतीने प्रभावीपणे केलेले सादरीकरण ऐकून रसिक अचंबित झाले. अनुपम जोशी यांना पुण्यातील प्रसिद्ध तबला वादक अनिरुद्ध शंकर यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले.




















