कर्मचा-यांची सेवा विषयक व वेतन विषयक माहिती अद्यावत १ जुलै २०२५ करावी
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी दिनांक १ जुलै २०२५ या संदर्भ दिनांकास अनुसरून त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचा-यांची सेवा विषयक व वेतन विषयक माहिती अद्यावत करावी, असे उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर माहिती https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do या संकेतस्थळावर ऑनलाईन अद्यावत करणे अनिवार्य आहे. संबंधित संगणकीय आज्ञावलीचे Username व Password जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे येथून प्राप्त करून घ्यावेत.
अद्यावत माहितीबाबतचे पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर २०२५ देय डिसेंबर २०२५ च्या वेतन देयकासोबत, तसेच माहिती बरोबर असल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०२६ देय मार्च २०२६ च्या वेतन देयकासोबत जोडणे बंधनकारक राहील. अन्यथा अशा कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून पारित करता येणार नाहीत. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी निर्धारित मुदतीत कर्मचा-यांचा माहिती कोष अद्यावत करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.





















