Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

Baba Adhav : कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी स्वतःचे आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला…

Baba Adhav

हमाल पंचायत ते एक गाव एक पाणवठा; बाबा आढाव यांचा प्रवास (Baba Adhav)

marathinews24.com

मुंबई (रेवण कोळेकर) : सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे बाबा आढाव हे आधुनिक महाराष्ट्राच्या चळवळींच्या केंद्रस्थानी उभे राहिलेले एक लढवय्ये होते. सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रखर प्रवर्तक आणि असंघटित मजुरांसाठी आयुष्य झोकून देणारे नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एका पर्वाचा शेवट होय.

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

हमाल, मजूर, तळागाळातील कष्टकरी, लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत, अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएमविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन यासाठी त्यांना ओळखलं जातं. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष आणि परिवर्तन यांचा प्रवास होय.

कोण होते बाबा आढाव

बाबासाहेब पांडूरंग आढाव म्हणजे बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर, पण मनाने पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. ते लहान असताना त्यांचे मामा त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या बैठकींना घेऊन जात. राष्ट्र सेवा दल समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक रचनेत मूलगामी बदल घडविण्याची चळवळ राबवत होते. याच चळवळीने बाबा आढावांच्या विचारांची पायाभरणी केली.

1952 चा दुष्काळ आणि अन्यायाविरुद्ध पहिला सत्याग्रह

1952 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. धान्याच्या किमती वाढत होत्या, शिधावाटप तुटपुंजे होते. त्याविरोधात बाबा आढावांनी सत्याग्रह केला. हा त्यांच्या सार्वजनिक संघर्षाचा पहिला निर्णायक टप्पा होता. याच काळात त्यांनी बाजारपेठेतील हमालांची दयनीय अवस्था जवळून पाहिली. दिवसभर जीव तोडून काम करणाऱ्या या मजुरांना किमान मजुरी, सुरक्षा, हक्क यापैकी काहीच मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी असंघटीत मजुरांसाठी काम करायचं ठरवलं.

हमाल पंचायतीचे सामाजिक मॉडेल

कामगार, मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी १९५५ साली हमाल पंचायतीची स्थापना केली. हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता. त्या माध्यमातून मजुरांचे शोषण थांबवणे आणि त्यांना न्याय्य कामाचे वातावरण निर्माण करून देणे, समान संधी देणे हा उद्देश होता. सन १९५६ साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळाले आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली.

दोन दशकांच्या संघर्षानंतर १९६९ साली राज्यात ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा’ लागू झाला. हा कायदा भारतातील असंघटित मजुरांसाठीचा पहिला संरक्षक कायदा ठरला. या कायद्यामुळे हमालांना सामाजिक सुरक्षा, नियमित मजुरी, कामगार हक्कांची कायदेशीर हमी, संघटनात्मक शक्ती उपलब्ध झाली.

शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसन

हमाल पंचायत फक्त मजुरांसाठी लढली नाही, तर त्या माध्यमातून समूदाय विकासाचे मॉडेल उभे करण्यात आले. हमाल पंचायतीच्या माध्यमातून मोफत शाळा, दवाखाना आणि वैद्यकीय सुविधा, निवासी वसाहत, कुटुंबासाठी सहाय्य, आर्थिक सुरक्षा, आरोग्य योजना राबवण्यात आल्या.

‘कष्टाची भाकर’ योजना

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबर १९७४ रोजी बाबा आढाव यांनी ‘कष्टाची भाकर’ योजना सुरू केली. हमालांना स्वस्तामध्ये पौष्टीक अन्न देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. हमालांच्या कुटुंबांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणे, महागाईच्या काळात हमाल समूदायाला आधार देणे, श्रमिक कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणे अशी कामे त्या माध्यमातून करण्यात आली. ही योजना पुढे महाराष्ट्रातील श्रमिक कल्याण योजनांचे मॉडेल ठरली.

एक गाव, एक पाणवठा : जातिव्यवस्थेवर थेट प्रहार

महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून दिला, सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला. ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरली.

भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी बाबा आढाव यांनी केली. बाबा आढाव यांचा लढा हा पूर्णपणे अहिंसात्मक आणि जनआधारित होता.

बाबा आढाव हे फक्त एक नेते नव्हते तर ते स्वतः एक संपूर्ण संस्था होते. समानता, न्याय, आणि तळागाळातील माणसाचा सन्मान हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते . त्यांच्या निधनाने असंघटित मजूर, कष्टकरी, ग्रामीण वंचित आणि तर्कनिष्ठ चळवळींच्या पथदर्शकाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी पेटवलेला विचारांचा दिवा आणि समाजातील प्रत्येक दुर्बलासाठी आवाज उठवण्याची वृत्ती ही पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल हे नक्की.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×