डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मांजरी-मुंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप प्रभाकर मुंढे (वय ३८, रा. माळी मळा, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात मुंढे यांची पत्नी मीनाक्षी (वय ३६) या जखमी झाल्या आहेत. याबाबत मीनाक्षी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील तुळशीबागेत मंगळसूत्र हिसकावणारी महिला अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी या एका शाळेत नोकरी करतात. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पत्नी मीनाक्षी यांना शाळेतून घेऊन पती संदीप हे दुचाकीवरुन घरी निघाले होते.मांजरी-मुंढवा रस्त्यावर समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार संदीप हे गंभीर जखमी झाले. दुचाकीवरील सहप्रवासी मीनाक्षी यांना दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या संदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर तपास करत आहेत.























