कोंढवा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कोंढवा खुर्द आणि महमंदवाडी परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटना नुकत्याच घडल्या असून, त्यासंबंधी कोंढवा आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त – सविस्तर बातमी
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा मिळून ४ लाख ५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १४ ऑक्टोबरला दुपारी सव्वाबारा ते रात्री सव्वासातच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील साईबाबानगरात घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.
घरातील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ३१ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना १० जून ते १४ ऑक्टोबर कालावधीत महमंदवाडीतील हेवन पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करीत आहेत.
घरफोडीत ५० हजारांची रोकडसह दागिने लंपास
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून ५ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १४ ऑक्टोबरला रात्री एकच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमधील टिळेकरनगरात घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा बुद्रूकमधील टिळेकरनगरात राहायला आहेत. १४ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील ५० हजारांची रोकड आणि सव्वा पाच लाखांचे दागिने असा ५ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.



















