बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावरील घटना
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर घडली. याप्रकरणी व्यापाऱ्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर बाजारात गुंतविण्याच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी हे कोंढवा परिसरातील साईनगर येथील एका सोसायटीत राहायला आहेत. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना राजयोग लाॅनसमोर अडवले. ‘दुचाकी नीट चालविता येत नाही का?’, अशी विचारणा करुन वाद घालण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना धमकावून खिशातील ४५ हजारांची रोकड लुटली. व्यापाऱ्याने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.



















