पुणे पोलिसांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – नागरिकांनो दिवाळीसाठी सहकुटूंब बाहेरगावी जात असल्यास घरासह फ्लॅटच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या वाढलेल्या घटनांमुळे चोरटे सुसाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ऐन दिवाळीत सोसायट्यांसह फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी करीत ऐवज चोरून नेल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करण्यासाठी मूळगावी जात असल्यास खबरदारी घेउन शेजारच्यांना माहिती द्यावी. सुरक्षारक्षक, सोसायटीचे अध्यक्षानाही सूचित करावे. असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
दिवाळीचा सण आनंद, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. विविध सण उत्सवात अनेकांकडून मूळगावी जाण्यास प्राधान्य दिले जाते. विशेषतः दिवाळीसाठी नोकर-चाकर, कामगार कुटूंबासह गावी जातात. मात्र, नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी केल्याचे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या घरांसह फ्लॅटची काळजी आपणच घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, सुटीमुळे अनेकांकडून दिवाळीमध्ये गावी जाण्याबरोबरच पर्यटन करण्यास प्राधान्य दिले जाते. ऐन सणासुदीच्या काळात महिलांकडून दागिने परिधान करण्यावर भर दिला जातो. मात्र, चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावून नेले जात असल्याचे दिसून आले आहे.
एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांतून केलेल्या प्रवासात मौल्यवान वस्तू, दागिने गहाळ किंवा चोरीला होण्याच्या भीतीने अनेकांकडून वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या जातात. मात्र, बंद घरांचे कुलूप फोडून चोरटे ऐवज लंपास करतात. त्यामुळे नागरिकांनी परगावी जाताना घरांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी शहरातील विविध भागांत घरफोडीच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळी सुटी निमित्ताने बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजारच्यांना माहिती देणे, सोसायटीचा सुरक्षारक्षकांना गावी जात असल्याचे सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे संभाव्य घरफोडीच्या घटना टाळता येणार आहेत. त्यासोबतच प्रवासादरम्यानही ऐवजाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
व्हॉट्सअप स्टेटस अन चोरीच्या घटना
दिवाळीच्या सुटीनिमित्त अनेकांकडून पर्यटनाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटससह फेसबुकवर अपलोड केले जातात. त्यामुळे संबंधित कुटूंबियाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. नेमकी संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी केली जात असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चोरट्यांनी फेसबुकवरील फोटो, व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून घरफोडी केल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे गावी जाताना अथवा पर्यटनाला गेल्यानंतर व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे लोकेशनचा दिखावा टाळल्यास चोरीसारख्या घटनांना आळा बसणार आहे.
पोलिसांसह नागरिकांचीही जबबादारी
दिवाळीनिमित्त मूळगावी जाणार्या नागरिकांनी घरातील सोने, रोकड, मौल्यवान दागिने सुरक्षितरित्या ठेवावे. त्याशिवाय सुरक्षारक्षक, शेजार्यांना गावी चालल्याची माहिती द्यावी. त्यामुळे संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, घरफोडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ अधिकार्यांना सुरक्षितेबाबत सुचित केले आहे. त्याशिवाय पेट्रोलिंग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पोलिसांसोबत नागरिकांनीही आपआपल्या मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे चोरीसह इतर घटना कमी घडण्यास मदत होणार आहे.
गावी जाताना अशी घ्या काळजी..
घरात सोने, रोकड ठेवू नका
सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी
घराला लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा गरजेचा
सोसायटीतील सीसीटीव्ही कार्यन्वित असल्याची खात्री करावी
रात्रीच्या वेळी घरातील आणि बाहेरील लाईट सुरू ठेवावी
संशयित दिसणार्या व्यक्तींची माहिती पोलिसांना द्यावी
शेजारील गावी जाणार नसल्यास त्यांना माहिती द्यावी




















