तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन’; अर्थकारण व उद्योजकता परिषदेचे उद्घाटन
marathinews24.com
पुणे – अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे. मात्र, फक्त वैयक्तिक संपत्ती वाढविण्याऐवजी, आपण एकजुटीने सामूहिकरीत्या अर्थनिर्मिती करू शकलो, तर खर्या अर्थाने विकसित भारत साकार होईल. विभाजित उन्नतीपेक्षा सामूहिक, राष्ट्रीय आणि जागतिक कल्याणाची भावना अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी सायंकाळी येथे केले. हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेबाबत अशी एकजूट साकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सलोखा सायकल यात्रा पुण्याहून पंजाबपर्यंत – सविस्तर बातमी
हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या वतीने आयोजित अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वर्ल्ड हिंदू फाऊंडेशनचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, फोरमचे पुणे जिल्हा अध्यक्ष गौरव त्रिपाठी, जस्टिस मदन गोसावी, चितळे उद्योगसमूहाचे गिरीश चितळे, बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक संचालक हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी स्वामी विज्ञानानंद लिखित ‘द हिंदू मॅनिफेस्टो’ आणि आदित्य पित्ती लिखित ‘विकसित भारत – इंडिया २०४७’ या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, व्यावसायिक, औद्योगिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर सर्वच व्यवसायांच्या माध्यमातून निर्माण होणार्या समृद्धीचा पाया नैतिकतेचा असावा, व्यवहारात पारदर्शकता असावी आणि सर्व क्षेत्रांत अर्थव्यवस्थेला चालना देणारे हिंदू उद्योजक एकत्र यावेत. हिंदू इकॉनॉमिक फोरमची मुळे आपल्या मातीत घट्ट रुजलेली असावीत, पण त्यांचे बहर जागतिक स्तरावर दिसावेत, अशा दृष्टीने कार्य घडावे. आपण एकजुटीच्या माध्यमातूनच हे साध्य करू शकतो. आपले प्राचीन ज्ञानसंचित आधुनिक तंत्र-यंत्रयुगाशी जोडण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
अर्थसमृद्धीचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील विशिष्ट गटच आर्थिक समृद्धीचे उपभोगकर्ते ठरतील. तळागाळापर्यंत आर्थिक समृद्धी पोहोचली पाहिजे. त्यासाठी समर्पित, राष्ट्रीयत्वाने परिपूर्ण अशा मानसिकतेचे उद्योजक हवेत. आपण बहुसांस्कृतिक असू, पण आपले राष्ट्रीयत्व समान आहे. आपल्या समृद्धीला सामाजिक जबाबदारी आणि कर्तृव्याचे भान असले पाहिजे आणि दायित्वाची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे तरच आर्थिक समृद्धीचे फायदे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून विकसित भारत साकारता येईल. आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेने सदैव सर्वांच्या कल्याणाची कामना केली आहे. तिचेच आचरण नव्या काळाला अनुरूप असे करून, सहसंवेदना, संवेदनशीलता आणि नैतिकता यांच्या आधारावर एकसंध मानसिकतेतून आर्थिक समृद्धीचे संकल्प फोरम यशस्वी करेल, असे ते म्हणाले.
स्वामी विज्ञानानंद म्हणाले, आपण आता पूजाअर्चा, भांगडा, दांडिया..या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. आर्थिक प्रणाली (फिनान्शियल इको सिस्टीम) सुधारण्याची तसेच विकसित होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता, प्रतिभा प्रचंड आहे, फक्त ती विखुरलेल्या अवस्थेत वैयक्तिक पातळीवर काम करते. तीच एकत्र आली, तर आपले गतिमान अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारेल. युवा पिढीने या प्रयत्नांना साथ देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांना, व्यापार्यांना सन्मान मिळाला पाहिजे. स्थानिकपासून जागतिक पातळीपर्यंत अशा एकत्रित प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हनुमंतराव गायकवाड यांनी बीव्हीजी ग्रुपची यशोगाथा कथन केली. प्रास्ताविक करताना गौरव त्रिपाठी यांनी हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या स्थापनेमागील उद्देश सांगितला. सर्व पातळ्यांवरील हिंदू एकमेकांशी जोडले जावेत, त्यांनी नवे आर्थिक स्रोत निर्माण करावेत, नेटवर्किंग सक्षम व्हावे, असे हेतू असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी अर्थमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ती वैचारिक बैठकही देईल आणि कृतीशील उपयोजनही सुचवेल, असे ते म्हणाले.
शंखनादाने आणि दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी आसावरी कुदळे, महेश वाघमारे, पियूष लाठी यांचा सत्कार करण्यात आला. खजिनदार जयेश मीना यांनी आभार मानले तर नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, उद्घाटनांनंतर परिषदेची दोन चर्चासत्रे संपन्न झाली. त्यामध्ये आदित्य पित्ती, हनुमंतरावर गायकवाड, भरत आगरवाल, डा. गुंजन भारद्वाज, प्रशांत जोगळेकर, हर्षवर्धन गुणे, ललिककुमार पहावा, वरुण खांदरे या उद्योजकांनी सहभाग घेऊन विचार मांडले.




















