दत्तवाडीत दोन गटात हाणामारी – परस्परविरोधी गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – वार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावताना झालेल्या वादातून दत्तवाडीच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांकडून याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आले असून, याप्रकरणी १० ते १२ जणांविरुद्ध गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.
दत्तवाडीतील ग्रामदैवतेचा उत्सव नुकताच पार पडला. गुरुवारी मध्यरात्री दत्तवाडी परिसरातून पालखी काढण्यात आली. त्यावेळी पालखी जात असताना दोन गटात हाणामारी झाली. सविता रोहिदास चोरगे (वय ४३, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवदास थोरात, निर्मला थोरात, सुनीता सोनवणे, संतोष थोरात, बक्की सोनवणे (सर्व रा. दत्तवाडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोलकरणीसह वॉचमन नवऱ्याचा दागिन्यांवर डल्ला – सविस्तर बातमी
गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी चोरगे यांच्या दिराने घरासमोर फटाक्याची माळ लावली. त्यावेळी आरोपींशी वादावादी झाली. वादावादीतून आरोपींनी फिर्यादी, त्यांची मुलगी, पुतणी, तसेच जावेला मारहाण केल्याचे चोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत निर्मला शिवदास थोरात (वय ५९, रा. दत्तवाडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय चोरगे, विलास चाेरगे, आयुष चोरगे, प्रकाश चोरगे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पालखीसमोर फटाक्यांची माळ लावल्याने फिर्यादी चोरगे यांच्या दंडाला चटका बसला. त्या कारणावरुन आरोपींनी थोरात यांच्या मुलाला मारहाण केली, तसेच घराच्या परिसरात राहणाऱ्या पाच महिलांना धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.