डी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंत

स्वयंपूर्ण गोवा उपक्रमामुळे कृषी, फलोत्पादन व कौशल्य विकास क्षेत्रात मोठी प्रगती – सावंत

marathinews24.com

पुणे – कोरोना काळात गोवे बर्‍याच अंशी परावलंबी होते. ते स्वयंपूर्ण होण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षांत विविध उपक्रम आम्ही राबविले. आमच्या स्वयंपूर्ण गोवे या उपक्रमासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून मिळालेली ही डी. लिट. गोवेकरांना समर्पित करतो. या डी.लिट.मुळे आमच्या स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला आणखी बळ मिळेल, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी काढले.

ग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी – सविस्तर बातमी

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा काल मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात पार पडला. या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आंध्र प्रदेशातील एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेशकुमार रेड्डी आणि ओबी हॉस्पिटॅलिटिज कंपनीचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. श्रीकुमार यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपाध्यक्षा डॉ. प्रणति रोहित टिळक, विश्‍वस्त सरिता साठे, निखिल मराठे, प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांसह विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ राबवत असलेल्या कौशल्याधारित नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाची प्रशंसा केली. ते म्हणाले, गोमंतकांच्या स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमासाठी ही पदवी मिळाली. सर्व गोवेकरांमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. या पदवीमुळे माझ्या कार्याची गती वाढेल. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. त्या काळात आम्ही बर्‍याचशा गोष्टींबाबत शेजारच्या राज्यांवर अवंलबून होतो. कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय संदर्भातही बर्‍याच अंशी आम्ही परावलंबी होतो. राज्यात पर्यटन क्षेत्र अधिक असल्याने आम्ही परावलंबी होत चाललो होतो. त्यामुळे राज्यातील कृषी आणि फलोत्पादन कमी होत चालले होते. कोरोना काळात त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हाच मी ठरविले की, गोवा स्वयंपूर्ण झाला पाहिजे. म्हणून स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम सुरू केली. 2 ऑक्टोबर 2020 रोजी गोव्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगर पंचायती या उपक्रमाशी जोडून घेतल्या. प्रशासकीय अधिकार्‍यांनाही जोडून घेतले. स्वत: या उपक्रमाच्या अग्रभागी राहून उपक्रम राबविला. पुढील दोन वर्षांत ही मोहीम पूर्णत: यशस्वी झाल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमांतर्गत राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. योजनांचा शंभर टक्के लाभ नागरिकांना मिळाला. त्यातून गोवा विविध क्षेत्रांत स्वयंपूर्ण होत गेला. कृषी, फलोत्पादनात क्रांती झाली. फलोत्पादनातील काही पदार्थ आम्ही शंभर टक्के आयात करत होतो. तेच पदार्थ आम्ही आता निर्यात करत आहोत. ही स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाची फलश्रुती आहे. आपण गोव्यातील तरूणांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देत आहोत. त्याचा परिणाम असा झाला की, पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जे ईशान्य भारतातील तरूण काम करत होते. तेथे आता गोव्यातील तरूण काम करत असल्याचेही सावंत यांनी नमूद केले.

कला, विज्ञान, संस्कृती, उद्योग, समाजसेवा अशा किती तरी प्रकारचे विद्यादान हे विद्यापीठ करत आहे. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केले आहेत. आजकाल विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाले की नोकरीचा शोध सुरू करतात. ते उद्योगाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. उद्योग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. गोवा भारत देशाच्या 14 वर्षांनी उशिरा म्हणजे 1961 मध्ये स्वतंत्र झाला. उशिरा स्वातंत्र्य मिळवूनही गोव्याने शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. परडोई उत्पन्न आणि विकासाचा दर चांगला आहे. येत्या काळात गोवा शैक्षणिक केंद्र होईल, त्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आम्हाला सहकार्य करत असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

फॅशनसाठी नव्हे, तर पॅशनसाठी काम करा- हेमंत ओबेरॉय

स्वयंपाककलेच्या क्षेत्रात येणार्‍या तरुणांनी फॅशनसाठी नव्हे, तर पॅशनसाठी काम केले पाहिजे. उत्कटता, चिकाटी आणि आपल्या कामाचा अभिमान या तीन गोष्टी यशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी योगायोगाने शेफ झालो. लहानपणापासून वैद्यकीय क्षेत्रासह सैनिक बनायचे स्वप्न होते. नंतर मी यूपीएससी परीक्षाही उत्तीर्ण झालो, मात्र मुलाखतीच्या वेळी आजारपणामुळे ती संधी हुकली. त्यानंतर मी स्वयंपाककलेच्या क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही, अशी भावना ओबी हॉस्पिटॅलिटीज फॉर्मर ग्रँड एक्झिक्युटिव्ह शेफ हेमंत ओबेरॉय यांनी व्यक्त केली.

टाटा समूहात तब्बल 42 वर्षे काम करताना जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटा यांच्या मूल्यांमधून निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कामातील नैतिकता यांचे धडे मिळाले. या उद्योगात काम करताना कुटुंबीयांचा संयम आणि पाठिंबा महत्त्वाचा होता. भारतीय पाककलेचा जागतिक स्तरावर मोठा ठसा आहे. भारतात सुमारे 25 हजार प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात, जे इतर कोणत्याही देशात नाहीत. त्यामुळे भारतीय असल्याचा अभिमान बाळगून भारतीय खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ओबेरॉय यांनी स्पष्ट केले.

सद्य:स्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक असला, तरी स्वतःची बुद्धिमत्ता आणि विचारसरणी जपणे महत्त्वाचे आहे. फ्युजन म्हणजे गोंधळ नव्हे. त्यामुळे परंपरेची मुळे विसरू नका. एकदा मुळे विसरलात तर तीही तुम्हाला विसरतील, असा सूचक इशाराही ओबेरॉय यांनी दिला. तरुणांनी कामाच्या ठिकाणी निष्ठा ठेवावी आणि वारंवार नोकर्‍या बदलण्यापेक्षा अनुभवातून स्वतःला घडवा. गरजवंत व्हा; पण लोभी बनू नका, हा यशाचा मंत्र त्यांनी तरुणांना दिला.

जीवनात संकटे येत राहतात कोरोनासारखी महामारी, दहशतवादी हल्ले किंवा युद्धजन्य परिस्थिती. मात्र सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करता येते. जर तुम्ही थकला असाल तरच निवृत्त व्हा, अन्यथा काम करत राहा, असा संदेशही ओबेरॉय यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखाव्यात-ए. महेशकुमार रेड्डी

प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तसेच, ज्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षणाचा पाया दिला आहे त्यांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आयुष्यात यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी विशेष क्षमता असते. ती ओळखून त्याचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या सेवेसाठी केला पाहिजे. अशा प्रकारे देशाची ताकद वाढते. आज अनेक लोक परदेशात जाऊन काम करत आहेत; पण आपल्या देशातही खूप मोठी क्षमता आणि संसाधने आहेत. त्यामुळे भारतातच राहून देशासाठी अधिक काम करण्याची गरज असल्याचे ए. महेशकुमार रेड्डी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×