नगर पथ विक्रेता समिती सदस्यांचे आयुक्तांना निवेदन
marathinews24.com
पुणे – फेरीवाल्यांचे दैनंदिन शुल्क कमी करावे,फेरीवाला व्यवसायात गॅस सिलेंडर वापरास वैध परवानगी देण्यात यावी,ज्यांनी व्यवसायासाठी अर्ज केले आहेत,त्यांना तातडीने व्यवसायाची मंजुरी व बिल वाटप करण्यात यावे, निवडून आलेल्या सदस्यांचा ५ वर्षांचा अधिकृत कार्यकाल आजच्या तारखेपासून लागू करण्यात यावा,पेशवेकालीन वारसा लाभलेल्या तुळशीबाग मार्केटला ‘हेरिटेज झोन’ म्हणून दर्जा बहाल करण्यात यावा अशा अनेक मागण्या नगर पथ विक्रेता समिती सदस्यांनी नगर पथ विक्रेता समिती बैठकीत केल्या.
पुणे महानगरपालिका आयुक्त तथा नगर पथ विक्रेता समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ जून २०२५ रोजी नगर पथ विक्रेता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.फेरीवाला आणि त्यांच्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन ठोस विषय मांडण्यात आले.बैठकीत सदस्य सागर दहीभाते,गजानन पवार,आशुतोष जाधव,कमल जगधने,नीलम अय्यर यांनी विविध मागण्या केल्या.भीमाबाई लाडके,ज्ञानेश्वर कोठावळे,शेहनाझ बागबान या सदस्यानी देखील उपयुक्त मुद्दे मांडले.संबंधित विषयांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली.या सर्व मुद्द्यांवर आयुक्त तथा समिती अध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सदस्य सागर दहीभाते यांनी दोन महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.२०१८ सालापासून आकारण्यात आलेले वाढीव दैनंदिन शुल्क पुनर्रचित करून त्यात जास्तीत जास्त सवलत देऊन ते कमी करावे तसेच आगाऊ शुल्क आकारले जाते त्यामुळे त्याला दंड लावू नये जेणेकरून हजारो फेरीवाल्यांवरील आर्थिक ओझे कमी होईल त्याचबरोबर पेशवेकालीन वारसा लाभलेल्या तुळशीबाग मार्केटला ‘हेरिटेज झोन’ म्हणून दर्जा बहाल करण्यात यावा,जेणेकरून हा ऐतिहासिक बाजार भविष्यकालीन शहर विकासात संरक्षित राहील.
सदस्य गजानन पवार यांनी मागणी केली की फेरीवाला निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा ५ वर्षांचा अधिकृत कार्यकाल २६ जून २०२५ या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून लागू करण्यात यावा.फेरीवाला व्यवसायात गॅस सिलेंडर वापरास वैध परवानगी देण्यात यावी,ज्यामुळे खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुलभ व सुरक्षित बनेल.तसेच वीज मिटर साठी तरतूद करण्यात यावी.
सदस्या कमल जगधने यांनी सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालय व प्रशासनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली.सदस्या नीलम अय्यर,आशुतोष जाधव यांनी स्पष्ट मागणी केली की, ज्या व्यावसायिकांकडे प्रमाणपत्र आहे आणी बिल मिळण्यासाठी वेळेत अर्ज केले आहेत झोनमध्ये जागा उपलब्ध आहे,त्यांना तातडीने व्यवसायाची मंजुरी व बिल वाटप करण्यात यावे.या सर्व मुद्द्यांवर आयुक्त तथा समिती अध्यक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित विषयांवर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.ही बैठक नगर पथ विक्रेत्यांच्या समस्यांकडे प्रशासनाच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात ठरणार आहे,असे या सदस्यांनी सांगितले