देशी गाईंच्या संवर्धनातून शाश्वत शेतीचा नवा मार्ग उघडतोय
marathinews24.com
पुणे – भारतीय संस्कृतीत देशी गायीला धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरांवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिचे दूध पोषक व आरोग्यदायी मानले जाते, तर शेण आणि गोमूत्राचा वापर जैविक शेती, आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक खत म्हणून केला जातो. त्यामुळे देशी गाय ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा आधारस्तंभ ठरते. मात्र, देशात देशी गायींची संख्या घटत असल्याची बाब चिंताजनक आहे. २०१९ च्या गणनेनुसार देशी गायींची संख्या सुमारे १४२.११ दशलक्ष असून, २०१२ च्या तुलनेत त्यात सुमारे ६ टक्क्यांची घट झाली आहे. महाराष्ट्रात गीर आणि सहिवाल या प्रमुख जातींचे पालन केले जाते. या पार्श्वभूमीवर देशी गायींचे शास्त्रीय संवर्धन, आरोग्य व्यवस्थापन, सुधारित प्रजनन आणि सेंद्रिय दुग्ध उत्पादन यावर आधारित मार्गदर्शन अत्यावश्यक ठरते.
भारताची जनगणना २०२७ – घरयादी व घरगणना: लोकशाहीच्या बळकटीची भक्कम पायाभरणी – सविस्तर बातमी
याच उद्देशाने देशी गो-संवर्धन लेख मालिकेद्वारे विविध देशी गायींच्या जाती, गोठा व्यवस्थापन, लिंगवर्गीकृत भ्रूण प्रत्यारोपण, आहार व चारा व्यवस्थापन, दुग्धप्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण, पशुआहार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, गो-पर्यटन आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकला जात आहे. या मालिकेच्या माध्यमातून देशी गाई संशोधन केंद्रातील कार्यपद्धतीची सखोल माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांना देशी गायींच्या संगोपनाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आलेले ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ हे देशी गोवंश संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके दिली जातात. बदलत्या हवामानाचा गायींच्या आरोग्य, आहार आणि प्रजननावर होणारा परिणाम लक्षात घेऊन येथे शास्त्रशुद्ध संशोधन केले जाते. एम्ब्रिओ ट्रान्सफर, लिंगनिश्चित वीर्य, उच्च प्रतीच्या वळूंच्या वीर्याचा वापर आणि पुढील पिढीच्या उत्पादनक्षमतेचा अभ्यास अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा येथे वापर केला जातो.
देशी गायींच्या दुधाचे गुणधर्म, रक्त आणि शरीरातील जैवरासायनिक घटक, तसेच आरोग्याचे नियमित परीक्षण यावर दीर्घकालीन संशोधन सुरू आहे. याशिवाय ऊर्जा बचतीसाठी गोबरगॅस आणि सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून पर्यावरणपूरक पशुपालनाचा आदर्श निर्माण केला जात आहे.
या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मुक्त गोठा व्यवस्थापन, देशी गोवंशाचे जतन, शाश्वत गोपालन मॉडेल, आहार व चारा उत्पादन, चाटण वीट व रॉक फॉस्फेटचे महत्त्व, गोमय-गोमूत्रावर आधारित लघुउद्योग, दुग्ध प्रक्रिया तंत्रज्ञान, बायोगॅस निर्मिती, सेंद्रिय खत व गांडूळखत निर्मिती, तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर यांसारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. या सर्व उपक्रमांमुळे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून पर्यावरणपूरक पशुपालनाची दिशा शेतकऱ्यांना मिळते.
मुक्त गोठा ही आधुनिक संकल्पना या प्रकल्पात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. या पद्धतीत जनावरांना मोकळ्या वातावरणात ठेवले जाते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनक्षमता वाढते. स्वच्छता, पोषण आणि नियमित आरोग्य तपासणी यावर विशेष भर दिला जातो. गोठ्यांमध्ये योग्य निचरा प्रणाली तयार करून मलमूत्र आणि पाणी एकत्रितपणे साठवून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर केला जातो. विशेषतः उलट्या पॅव्हर ब्लॉक्समुळे पावसाळ्यातही पाणी साचत नाही, त्यामुळे कासदाह व त्वचारोगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
देशी गोवंश वाढीसाठी प्रकल्पात लिंगवर्गीकृत भ्रूण प्रत्यारोपण (IVF, ET) आणि लिंगनिश्चित वीर्याचा वापर केला जात आहे. या माध्यमातून उच्चवंशीय आणि जनुकीयदृष्ट्या सक्षम गायींची निर्मिती केली जाते. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके देण्यात आली असून, सुमारे ६० भ्रूण प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहेत. यामधून गिर, सहिवाल आणि थारपारकर जातींच्या उच्च दर्जाच्या कालवडी तयार करण्यात आल्या आहेत.
आहार व्यवस्थापन आणि चारा उत्पादन हे देशी गोपालनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. प्रकल्पातील गायींना संतुलित आहार देताना हिरवा चारा, सुक्या चाऱ्याबरोबरच पोषणयुक्त खाद्य दिले जाते. गायींच्या वय, वजन आणि उत्पादनक्षमतेनुसार आहाराचे प्रमाण ठरवले जाते. प्रक्षेत्रात संकरित नेपियर, मका, ज्वारी आणि लसूण गवत यांसारख्या चारा पिकांची लागवड करून वर्षभर चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाते. तसेच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून साठवणूक केली जाते, ज्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ होत आहे.
मुरघास तंत्रज्ञानावरही येथे संशोधन सुरू असून पारंपरिक सायलोपिट व सायलो बंकर पद्धतींसोबतच आधुनिक बेलर आणि बॅग तंत्रज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. टिकवण क्षमता, खर्च, हाताळणी सुलभता, यांत्रिकीकरण आणि संरक्षण या सर्व बाबींचा विचार करून शाश्वत पद्धती विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
गायींच्या पोषणासाठी चाटण वीट आणि रॉक फॉस्फेटचा नियमित वापर केला जातो. यामुळे हाडांची मजबुती, पचनक्रिया आणि प्रजननक्षमता सुधारते. तसेच प्रकल्पात विकसित केलेल्या हर्बल गार्डनमध्ये शेवगा, कोरफड, तुळस, कढीपत्ता, लेमन ग्रास, अडूळसा आणि शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पतींचा वापर जनावरांच्या नैसर्गिक उपचारासाठी केला जातो आणि शेतकऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण दिले जाते.
अशा प्रकारे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम साधत शाश्वत पशुपालनाचा आदर्श उभा करत आहे. हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन देऊन देशी गोपालनाला नवी दिशा देत आहे.























