पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती, विवेक फणसाळकर आज होणार निवृत्त
marathinews24.com
पुणे – राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे ३० एप्रिलला सेवाजेष्ठतेनुसार निवृत्त होत आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या जागी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले देवेन भारती यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी भारती हे पदभार स्वीकारणार आहेत.
कृषी योजनांच्या लाभासाठी ‘अँग्रिस्टॅक ‘ नोंदणी करणे बंधनकारक – सविस्तर बातमी
देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांचा जन्म बिहारमधील दरभंगामध्ये झाला आहे. दिल्लीतून त्यांनी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत यश मिळविले होते. भारती हे अनुभवी अधिकारी असून, त्यांनी मुंबईतील विविध पदावर काम केले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम करताना अनुभवाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपल्या कारर्किदीत पोलीस उपायुक्त झोन ७, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, विशेष पोलीस आयुक्त, महाराष्ट्र एटीएस प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. त्यांनी २०१४ ते २०१९ कालावधीत संयुक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विभागात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, २०१९ मध्ये राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर देवेन भारती यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर आता त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.