पुणे येथून १७ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय पंधरवड्याचा शुभारंभ; तीन टप्यात राबविला जाणार उपक्रम
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात १७ सप्टेंबर रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहातून होणार आहे. महसूल, ग्रामविकास, नगररचना, आरोग्य, ऊर्जा, सामाजिक न्याय, महिला व बालविकास तसेच आदिवासी विकास विभागांच्या विविध सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव नागरिकांना मिळावा यासाठी हा पंधरवडा युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी
सेवा पंधरवड्यात महसूल विभागामार्फत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, आधारकार्ड सुविधा या सेवा दिल्या जाणार आहेत. ग्रामविकास व नगरप्रशासन विभागामार्फत मालमत्ता नोंद, नळजोडणी, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदी व प्रमाणपत्र वितरण, मालमत्ता कर आकारणी या सेवा उपलब्ध होतील. महावितरण विभागाकडून प्रलंबित घरगुती विद्युत जोडण्या तसेच मालमत्ता हस्तांतरणानंतर वीजजोडणीचे नावांतरण केले जाणार आहे. आदिवासी विकास विभागाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत सिंचन विहिरींची नोंदणी तसेच अनुसूचित जमातींना प्रलंबित वनहक्क पट्टे देण्याचे काम होईल. सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग प्रमाणपत्र तर आरोग्य विभागाकडून लसीकरणासह विविध आरोग्यसेवा पुरवल्या जातील. महिला व बालविकास आणि कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगारसंधी, सखी किट वाटप, रोजगार मेळावे आणि प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे या सेवा राबवल्या जातील.
या सेवांच्या अंमलबजावणीसाठी सेवा पंधरवड्याचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात (१७ ते २२ सप्टेंबर) पाणंद व शिवार रस्त्यांचे क्रमांकन, नोंदणी, मोजणी व सीमांकनासह वाद मार्गी लावण्यासाठी रस्ता अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) ‘सर्वासाठी घरे’या उपक्रमांतर्गत सरकारी जमिनीवर घरकुलांसाठी कब्जहक्क, झोपडपट्टी अथवा अतिक्रमण नियमितीकरण तसेच पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व सेवांसाठी संबंधित अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, नागरिकांनी सेवा पंधरवड्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





















