सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ७५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
याबाबत एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वेगवेगळ्या नावाने महिलेशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल क्रमांकाचा वापर करणारे चोरटे, बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी १६ ऑगस्ट रोजी संपर्क साधला होता. ज्येष्ठ महिलेशी संपर्क साधताना चोरट्यांनी ‘व्हिडीओ काॅल’ सुविधेचा वापर केला होता. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता.
‘काळ्या पैसा व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी सीबीआयकडून सुरू असून, याप्रकरणात तुम्हाला आणि तुमच्या पतीला अटक हाेण्याची शक्यता आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्यांनी महिलेला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी १९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. महिलेने याबाबत चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी त्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कारवाईसाठी बँक खात्यात वापर करण्यात आल्याची भीती दाखवून चोरट्यांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसंनी गुन्हा दाखल केला होता.





















