मातीतली, संस्कृतीतील भाषा स्वीकारावी : विजय कुवळेकर, रोटरी मराठी साहित्य संमेलनात ‘माध्यमांची भाषा आणि साहित्यभान’ विषयावर परिसंवाद
marathinews24.com
पुणे – भाषा ही संस्कृतीची वाहक असते. बदलत्या काळाशी संवादी असले तरी भाषेचे मूळ रूप जपले जायला हवे आणि ही जबाबदारी माध्यमांची आहे. भाषेवर प्रेम असेल तर मातीतली, संस्कृतीतील भाषा स्वीकारावी, असे मत ‘माध्यमांची भाषा आणि साहित्यभान’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.
आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर – सविस्तर बातमी
रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे दुसऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 21) ‘माध्यमांची भाषा आणि साहित्यभान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात विजय बाविस्कर (लोकमत), श्रीधर लोणी (महाराष्ट्र टाइम्स), सिद्धार्थ केळकर (लोकसत्ता), आर जे संग्राम खोपडे यांचा सहभाग होता.
भाषेची हत्या न करता भाषा समृद्ध करणे आवश्यक असल्याचे सांगत कुवळेकर म्हणाले, भाषा प्रवाही असते हे मान्य आहे. पण त्यातील मूळपण सोडू नये. भाषेने प्रवाहात हरवून जावू नये. त्या प्रवाहाला भाषेने सामावून घ्यावे. आपल्या मातीतील वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत स्वीकारून भाषा समृद्ध करावी. वाचनातून भाषेवर प्रेम वाढते. संवेदनशीलता नसल्यास माध्यमातील भाषा घातक ठरू शकते. आपण जी भाषा वापरतो त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भाषा साधी, सोपी, प्रवाही असतानाच संवादीही असावी. भाषेचे प्रवाहीपण स्वीकारले जायला हवे.
विजय बाविस्कर म्हणाले, माध्यमांची भाषा संवादी, प्रवाही, विवेकवादी, संतुलित असावी ती विखारी, विषारी असू नये. ज्ञानापेक्षा भान असणे अधिक आवश्यक झाले आहे. ज्ञानाला भानाची आणि भाषेच्या उत्तम ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. साहित्य आणि माध्यमे दोन्हीही भरकटू नये म्हणून एकमेकावर त्यांचा अंकुश असायला हवा. पर्यायी शब्द निर्माण व्हावे पण अकारण अट्टाहास नसावा, असेही ते म्हणाले.
भाषा बदलते, बदलायला हवी. कारण बदल हा भाषेचा गुणधर्म आहे, असे सांगून श्रीधर लोणी म्हणाले, काळानुरूप नवे शब्द तयार होतात, जुने लोप पावत जातात. संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील भाषा आज चालत नाही. नागरिक भाषा घडवत असतात. पण त्यातील व्याकरण जपणे, त्याची काळजी घेणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. माध्यमात जे येते ते घाईघाईत निर्माण झालेले साहित्यच असते. पत्रकारिता आणि साहित्य यात लीलया वावरणारे कायमच होते आणि राहतील. त्यामुळे माध्यम आणि साहित्य यांचा कायमच जवळचा संबंध आहे. दृश्य आविष्करालाही लिखित साहित्याचा आधार असतो. माध्यमांनी कायमच वाचन आणि साहित्य, संस्कृती विषयी अभिरुची वाढविली आहे.
सिद्धार्थ केळकर यांनी सांगितले की, नवसाक्षराचे पाहिले साहित्य म्हणजे वृत्तपत्र असे आम्ही शिकलो. रोज एक वृत्तपत्र छापणे म्हणजे एक पुस्तक छापण्याएवढे शब्द असतात. त्यामुळे यातील भाषा ही कर्ता, कर्म, क्रियापद याच क्रमाने यायला हवी हे भान असणे आवश्यक आहे. विविध भाषांच्या आक्रमणामुळे आपली भाषा बिघडणार नाही याचे भानही ठेवावे लागते. प्रत्येक वृत्तपत्राचे स्टाईल बुक वेगवेगळे होते. आता ही पद्धत संपुष्टात आली. त्यामुळे वृत्तपत्रातील भाषेत प्रदूषण झाले आहे.
व्याकरणाचे शास्त्र जपत भाषा समृद्ध करणे आवश्यक आहे. वेगळे उच्चार, बोली भाषेसकट स्वीकारणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता टाळणे शक्य नसल्याने त्या विषयात शिकून घेणे, शिकवणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला जर आपल्या भाषेतील विविध शब्दसंग्रह शिकवले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. भाषेला समृद्ध करण्यासाठी पर्यायी शब्द निर्माण करून ते प्रचलित करण्याचे कार्य माध्यमांनी करणे आवश्यक आहे.
रेडिओ माध्यमातील भाषेसंदर्भात बोलताना संग्राम खोपडे म्हणाले, खासगी मराठी एफ. एम. वाहिन्या आल्या तरी त्यांचे मालक अमराठी आहेत. त्यामुळे हिंदी भाषेचा वापर सहजतेने सुरू झाला. त्यामुळे मराठी साहित्याचा फार संबंध उरला नाही. चांगले साहित्य किंवा कलाकृतीची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा समाजातील सर्व स्तरातील आवाज पुढे येतो.





















