समर्थ पोलिसांकडून आरोपीला बेड्या, खुनाची झाली उकल
marathinews24.com
पुणे – अनैसर्गिकरित्या संबंध प्रस्थापित करण्याच्या वादातून मित्राच्याच डोक्यात टणक वस्तूने मारहाण करीत खून केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधिताला समर्थ पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही घटना ५ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळील पदपथावर घडली होती.
एटीएम कार्डचा गैरवापर, दोन महिलांची ९० हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी
किशोर कांबळे (वय ३७ रा. पुणे स्टेशन ( फिरस्ता) मुळ रा. सातारा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी भीम नामदेव गायकवाड (वय ४० रा.पुणे स्टेशन (फिरस्ता) मुळ रा.भीम नगर, लमान तांडा जवळ, बाभळगाव ता. जि.लातुर याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळील पदपथावर ५ मे ला तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली असता, संबंधिताच्या डोक्यात कशाच्यातरी सहायाने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यात रजि नंबर ९२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्याकरीता चार पोलीस पथक रवाना केली होती. पथकांनी घटनास्थळासह आजुबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेर तपासुन तांत्रिक विश्लेषन केले. त्यावेळी किशोर कांबळे याचा मित्र भीम गायकवाड याने खून केला असल्याची माहिती पथकाला मिळाली.
समर्थ पोलिसांनी सापळा रचून गावी जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी भीम गायकवाड याला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने किशोर कांबळे सोबत असलेल्या अनैसर्गिक शारीरीक संबंधाच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. दोघेही फिरस्ते असल्यामुळे आम्ही मित्र झालो होतो. आमच्यात अनैसर्गिंक संबंध प्रस्थापित करण्यावरून वाद झाला. त्यानंतर किशोरचा खून केल्याचे त्याने सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, संजय दगडे, भिमराव बाबर, इम्रान शेख, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, जाधव, शरद पाटील, प्रविण होळकर, प्रफुल साबळे, कपील चौरे, भाग्येश यादव, सुनिल पवार, प्रकाश सोलनकर निलम कर्पे यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करत आहेत.
फिरस्ता तरूणाच्या खूनप्रकरणी आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. अनैसर्गिक संबंधाच्या वादातून आरोपीने तरूणाच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे