दस्तकारी हाट समिती चा प्रतिष्ठित क्राफ्ट बाजार आता पुण्याच्या नव्या सांस्कृतिक कलाग्राम केंद्रामध्ये
marathinews24.com
पुणे – पारंपरिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारी दस्तकारी हाट समिती, ज्याची स्थापना सुप्रसिद्ध समाजसेविका जया जेटली यांनी केली आहे, आपल्या प्रतिष्ठित दस्तकारी हाट क्राफ्ट बाजारच्या पुनरागमनाची घोषणा करत आहे. यंदा हा बाजार पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कार्यक्रम यांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या कलाग्राम या सुंदर आणि सांस्कृतिक वातावरणात आयोजित केला जाणार आहे. हा बाजार सिंहगड रोड, पुणे येथील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील, पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या शेजारील कलाग्राम, येथे भरविण्यात येणार आहे. कलाग्राम हे अलीकडेच पुणेकरांसाठी उघडलेले एक नवे सांस्कृतिक केंद्र आहे, जिथे कला, हस्तकला, कलाकार कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
‘हृदय गाणी’ : सुरेल गीतांची रंगली मैफल – सविस्तर बातमी
हा आकर्षित क्राफ्ट बाजार ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान, दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहील. देशभरातील कलावंत आणि कारागीर यांच्या १२० पेक्षा अधिक स्टॉल्समधून कला, हस्तकला आणि वस्त्रनिर्मितीतील अप्रतिम कौशल्याचे दर्शन घडणार आहे, ज्यातून हजारो कारागीर कुटुंबांची सर्जनशीलता आणि कौशल्य झळकणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे, तसेच या समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री सौ. माधुरी सतीश मिसाळ आणि त्यांच्या कन्या, वास्तुशिल्पी कु. तीर्था मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे उपस्थित राहणार आहेत. दस्तकारी हाट समिती तर्फे सौ. जया जेटली, अध्यक्षा आणि सौ. चारू वर्मा, प्रकल्प प्रमुख आणि मान्यवर पाहुने या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या बाजारात महाराष्ट्रातील काही नामांकित कारागीर सहभागी होणार आहेत, मिनू जोशी, टॉय ट्रंक प्रायव्हेट लिमिटेड – चन्नपटणा खेळणी तयार करण्यात विशेष प्रावीण्य.
झुमकी अय्यंगर, ओह्र्ना – ज्यूट व कापडावर कांथा भरतकाम करण्यात निपुण
प्रवीण बडवे, परसराम औद्योगिक हातमाग विणकर सहकारी संस्था, नागपूर – कोसा सिल्क साडी, कोसा सिल्क कापड व ड्रेस मटेरियल तयार करण्यात विशेष प्रावीण्य.
रोहित शंकर राठोड, एम्ब्रॉयडरी बंजारा – बंजारा भरतकामात निपुण.
संतोष विजय मोरे, टुकाझ एक्सपोर्ट – हस्तनिर्मित चामड्याच्या कोल्हापुरी चप्पल तयार करण्यात विशेष कौशल्य.
नीराज व्ही. बोराटे, प्रा. विनायक बोराटे फाउंडेशन – घोंगडी आणि गोधडी (क्विल्ट) तयार करण्यात प्रावीण्य.
तसेच या क्राफ्ट बाजारात महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांतील काही प्रमुख कारागीर सहभागी होणार आहेत: अरशद काफील, सजावट हँडिक्राफ्ट्स, उत्तर प्रदेश – लाकडी कोरीवकाम आणि इनले मध्ये तज्ज्ञ. चमन सिजू, गुजरात – विणकाम कारागीर. चंचल चक्रवर्ती, तरांबा आर्ट्स, दिल्ली – धातूचे हस्तकला क्षेत्रातील प्रावीण्य. कुलदीपक आणि नवीन सोनी, पिचवाई स्टोअर – पिचवाई पेंटिंग तज्ज्ञ. परबात कंजी वर्कर, गुजरात – विणकाम कारागीर. खेताराम सुमरा, रोहिडा हँडलूम्स, राजस्थान – पट्टू विणकाम तज्ज्ञ. जहांगिर भट, द क्रूएल, जम्मू व काश्मीर – क्रूएल भरतकाम मध्ये प्रावीण्य. विश्वनाथ ए. विशनेचर, कर्नाटक – केळीच्या तंतूंची हस्तकला. अनिता, हिमाचल प्रदेश – चांबा भरतकाम तज्ज्ञ. रामजा मरवाडा, ए टू झेड कला कॉटन – हातमाग काला कॉटन मध्ये तज्ज्ञ. रंजीता ढाल, खोज ओडिशा सबाई क्राफ्ट, ओडिशा – सबाई ग्लास विणकाम मध्ये प्रावीण्य. सुखीराम मरावी, मध्य प्रदेश – गोंड पेंटिंग तज्ज्ञ. मोनाली रॉय, दिल्ली – पश्चिम बंगाल विणकाम क्षेत्रातील कारागीर.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना, दस्तकारी हाट समितीच्या संस्थापक जया जेटली यांनी सांगितले, “पुणे महानगरपालिकेने स्थापन केलेल्या या नव्या सर्जनशील मंचाचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. गेल्या ११ वर्षांपासून आम्ही पुण्यात वार्षिक क्राफ्ट कार्यक्रम आयोजित करत आलो आहोत, आणि आता ‘कलाग्राम’ हे आमच्या सांस्कृतिक कारागिरांसाठी खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी घर ठरेल आहे. अशा स्वागतार्ह वातावरणात कलाकार घडतील आणि ‘दस्तकारी हाट’ नेहमीप्रमाणे भारताच्या पारंपरिक कौशल्याचे सर्वोत्तम दर्शन घडवेल.”
कार्यक्रमाबद्दल आपले विचार मांडताना, तीर्था मिसाळ म्हणाल्या, “कलाग्राम हे आपल्या शहराच्या आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा विचार करून तयार केले गेले आहे, ज्याद्वारे काहीतरी अद्वितीय निर्माण करता येईल. दिली हाटचे निर्माते दस्तकारी हाट समिती या पुढाकार घेऊन या सुंदर प्रवासाची सुरुवात करत आहेत याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.”
या वर्षीच्या बाजारात ३० पेक्षा जास्त नवीन हस्तकला, कला आणि वस्त्रप्रदर्शने पाहायला मिळणार आहेत. यासोबतच भेट देणाऱ्यांसाठी कौशल्य प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कार्यक्रमाच्या मनोरंजकतेसाठी पश्चिम बंगालचे छऊ नृत्य, राजस्थानचे मंगनियार गायक यांसारख्या लोककलासमुप्रसाद देखील असतील. तसेच राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जुन्या दिल्लीच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा स्वाद अनुभवता येईल. हा उत्सव ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान, दररोज सकाळी ११:३० ते संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचे तपशील:
• स्थळ: कलाग्राम, पी. एल. देशपांडे गार्डन, पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाजवळ, सिंहगड रोड, पुणे
• दिनांक: ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५
• वेळ: सकाळी ११:०० ते रात्री ८:००



















