तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा; वाघोलीतील १० एकर जमीन लाटण्याचा डाव उधळला
marathinews24.com
पुणे – बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेला जागा मालक भासवून वाघोलीतील कोट्यावधी रुपयांची १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्याच्या बाजार भावानुसार जमिनीची किंमत १२५ ते १३५ कोटींवर असल्याचे बोलले जात आहे.
आनंद लालासाहेब भगत (केसवड वस्ती, वाडेगाव, ता. हवेली), शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर), तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर ( रा. इस्लामपूर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी आनंद भगत याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला दि. २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. हा प्रकार २०२२ ते मे २०२३ कालावधीत घडला. चंदननगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील गट क्र. १२७६, हिस्सा ३८ मध्ये अपर्णा वर्मा यांच्या नावे १० एकर जमीन आहे. त्या दुबईला राहायला असल्याने आरोपीनी जमीन हडपण्याचा कट रचला. त्यानुसार अर्चना पटेकर हिला बनावट नाव (अपर्णा यशपाल वर्मा) वापरून मूळ मालक असल्याचे भासवले. खोटे आधार कार्ड, पॅन कार्डद्वारे बनावट दस्त तयार केले. २०२२ ते १७ मे २०२३ कालावधीत हवेली निबंधक कार्यालय क्र. ७ येथे खरेदी खताची नोंदणी केली. त्यानंतर भगतने २०२३ मध्ये मूळ जागा मालक अपर्णा वर्मा यांनीच बनावट दस्त तयार करुन जमीन मला विक्री केल्याची खोटी फिर्याद चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर अपर्णाला सेटलमेंटला बोलावून जमीन स्वस्तात लाटण्याचा आरोपींचा डाव होता. मात्र, एफआयआरचा खोटी नोंदवल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.
पोलिसांनी आनंद भगत यांच्या वाडेगावातील राहत्या घरी झडती घेतली. त्याठिकाणाहून पोलिसांनी वेगवेगळ्या नावाने असलेले दस्तावेज, झेरॉक्स प्रत, खरेदीखत, संमतीपत्रे, करारनामे, वीजबिल कागदपत्रे जप्त केली. अपर्णाच्या नावाने बनावट कागदपत्रांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती समोर आल्या आहेत. दरम्यान, आरोपी शैलेश ठोंबरे हा तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांचा मेहुणा असून, आरोपींनी संगनमताने फसवणूक केली. बनावट महिलेच्या नावे दस्त नोंद झाली.