जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांचा डल्ला
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगसह आयपीओत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ३८ लाख २४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर कालावधीत खडक परिसरातील टिंबर मर्चंट कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी ५१ वर्षीय तक्रारदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आई मरीमाता मंदीरात बसलोय… बिगबॉस विजेता सूरजचे अश्रू थांबेनात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टिंबर मर्चंट कॉलनीत राहायला असून, ३ नोव्हेंबर २०२४ ला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत संवाद साधून ऑनलाईनरित्या अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना शेअर मार्वेâटसह आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. जेवढी जास्त रक्कम गुंतवणूक कराल, तेवढा नफा जास्त मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले.
त्यानुसार तक्रारदाराने रक्कम गुंतवणूकीला सुरूवात केली. तब्बल ३८ लाख २४ हजार रुपये जमा केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला फोन करून विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करीत आहेत.