१२ किलो गांजा जप्त
marathinews24.com
पुणे – Crime News लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोहगावमधील कर्मभूमीनगर परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली. त्यानंतर तपात पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अंगझडतीत अखिलेश मंडळ याच्या कापडी पिशवीत १२ किलो गांजा सापडला, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. मंडल हा बांधकाम मजूर आहे. त्याने गांजा कोठून आणला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे आणि पथकाने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली होती.
अमली तस्करांविरूद्ध कठोर कारवाई करा-पोलीस आयुक्त
अमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले विक्रेत्यांची चौकशी करुन अमली पदार्थांचा पुरवठा करणार्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, २ दुचाकी जप्त
Crime News : दुचाकी चोरणार्या चोरट्यांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ओंकार संतोष सातपुते (वय २०, रा. लायगुडे वस्ती, धायरी), साईराज अतुल तावरे (वय १८, रा. कांबळे वस्ती, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धायरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते.
सराइत चोरटे सातपुते आणि तावरे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, मिसाळ, क्षीरसागर, राजू वेगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, संग्राम शिनगारे यांनी केली.