घरातील मोलकरणीनेच दागिन्यांवर मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून मोलकरणीनेच कपाट्यातील ५ लाख २ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना २१ ते २५ एप्रिलला औंधमधील प्रिझम सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी मोलकरणीला अटक केली असून, तिच्याकडील दागिने जप्त केले आहेत. अलका रामदास धरणे (३० रा. जुनी सांगवी ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्वदीप गाढवे (वय २५, रा. औंध ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
भाईगिरी करणाऱ्याला केले स्थानबद्ध, विमानतळ पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवे कुटूंबिय औंधमधील प्रिझम सोसायटीतील बी विंगमध्ये राहायला आहेत. २१ ते २५ एप्रिलला ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी तक्रारदार गाढवे यांची बहीण घरी होती. घरमालक नसल्याची नेमकी संधी साधून मोलकरीण अलका धरणे हिने त्यांच्या कपाटातील ५ लाख २ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गावाहून आल्यानंतर गाढवे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन मोलकरणीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यावेळी तिने दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.