15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रदर्शन
marathinews24.com
पुणे – केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत बहुमाध्यम माहिती व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरविण्यात येणार आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नागरिकांना पोषण आहार, संतुलित आहाराचे महत्त्व, तसेच आरोग्यविषयक विविध माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात 360 डिग्री व्हिडिओ फिल्म, डिजिटल प्रश्नमंजुषा, 3 डी सेल्फी झोन, सिरॅमिक बोर्ड, डिजिटल माहिती पुस्तिका, एलईडी स्क्रिन इत्यादींच्या माध्यमातून माहिती सादर करण्यात येणार असून आपल्या आहारातून कमी झालेल्या भरड धान्यविषयक देखील माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ ला उस्फुर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी
प्रदर्शना दरम्यान लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी पोषण, सर्वांचे आरोग्य’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे केंद्रीय संचार ब्युरो, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे आणि उपजिल्हा रुग्णालय, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका, बचत गटातील महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनादरम्यान नागरिकांना पोषण आहार नमुन्यांचे प्रदर्शन व शारीरिक पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येईल.



















