पूना गेस्ट हाऊसतर्फे हिंदी-मराठी गीतांचा नजराणा
marathinews24.com
पुणे – कोजागिरी पौर्णिमेची रम्य सायंकाळ आणि सुरेल हिंदी-मराठी गीतांचा नजराणा यातून रसिकांवर स्वरांची बरसात झाली. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित ‘ही पौर्णिमा स्वरांची..’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. सोमवारी (दि. ६) रोजी पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी
प्रिती पेठकर, प्रिया सप्रे, मनोज सेठीया, संजय कांबळे आणि रवींद्र शाळू या प्रथितयश कलाकारांनी रसिकांची सायंकाळ सुमधुर गाण्यांनी सजविली. हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या गाण्यांसह हेमंतकुमार व तलत मेहमूद यांनी गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या सुप्रसिद्ध गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. तर कधी सुरात सूर मिसळत अनेक गीतांना वन्स मोअरची मागणी केली. ‘वो शाम कुछ अजिब थी’ या पहिल्या गीतापासूनच रसिकांवर कलाकारांनी सुरांची मोहिनी घातली आणि वन्स मोअरचा सिलसिला सुरूच राहिला.
‘याद किया दिल ने’, ‘भंवरा बडा नादान’, ‘कही दिप जले कही दिल’, ‘इतना ना मुझसे तू प्यारी बढा’, ‘न तुम हमे जानों’, ‘पुकारलू तुम्हारा इंतजार है’ या व अशा अनेक सदाबहार हिंदी गीतांसह ‘मी डोलकर’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘शुक्रतारा मंद वारा’ या मराठी गीतांसह ‘चांद मेरा दिल’, ‘ना ये चांद होगा’, ‘गली मे आज चांद निकला’, ‘खोया खोया चांद’ अशा हिंदी गीतांनी कोजागिरीची सायंकाळ अधिकच खुलवत नेली.
पुण्यातील ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांचा आवाज समजल्या जाणाऱ्या विजय केळकर यांनी खास रसिकाग्रहास्तव ‘जिंदगी कैसी है पहेली हाए’ हे गीत सादर केले. सुमधुर आवाजात कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ममता क्षेमकल्याणी आणि निलाक्षी महाडिक यांनी केले. कलाकारांचा सत्कार किशोर सरपोतदार यांनी केला. तर अजित कुमठेकर यांनी संयोजन केले. डॉ. प्रसाद पिंपळखरे, डॉ. संजीव वेलणकर, राजेश दातार, आनंद सराफ, दत्तात्रय तापकीर, डॉ. भवाळकर, संगीता माने, प्रकाश पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.



















