न्यायालयाच्या आदेशाने वकीलासह बँक अधिकार्यावर गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे– विकलेल्या जागेची पुन्हा विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार वकीलासह बँक अधिकार्याविरूद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२३ ते ५ मे २०२४ कालावधीत कोंढव्यातील चंदन गार्डन येथे घडली आहे. अॅड. विक्रम ईमानुअल अमोलिक (वय ४२, रा. गुलमोहर हेबीर, कोंढवा) जॉर्ज राजन उनिथान (वय ४५, रा. सन संपहिरे सोसायटी, फातीमानगर) आणि एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अतिश भाऊसाहेब भुजबळ (वय ३७, रा. चंदन गार्डन, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भुजबळ यांना घराशेजारी चंदन गार्डन येथील एका गुंठ्यावर तीन मजली घर विक्रीसाठी असल्याचे समजले. त्यांनी घरमालक विक्रम ईमानुअल अमोलिक याच्याशी संपर्क साधून ६४ लाखांत घराचा व्यवहार केला. संबंधित जागेत राहणार्या भाडेकरूने दिलेले ९ लाख रुपये डिपॉझिट भुजबळ यांनी दिले. ७३ लाखांत संबंधित जागेची खरेदी केली होती. त्यानंतर ५ मे २०२४ रोजी चौघे जागेची पाहणी करायला आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर आरोपी विक्रम अमोलिकने जॉर्ज राज उनिथान याला २०१८ मध्येच ही मिळकत विकल्याचे दिसून आले. अमोलिक, जॉर्ज उनिथान यांनी एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकार्यासोबत संगनमत करुन जागेची किंमत १ कोटी रुपये दाखवली.
कंपनीकडून जॉर्ज उनिथान याने ९८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यानुसार जॉर्ज हा जागेवर दावा सांगत असतानाच कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीही मिळकतीवर दावा करु लागली. याबाबत भुजबळ यांनी अमोलिकला जाब विचारल्यावर, ‘मी वकील आहे. माझे कोणीही वाकडे करु शकणार नाही, तुला काय करायचे ते कर’, असे म्हणून त्यांना हाकलून दिले. त्यावेळी कोंढवा पोलिसांनी भुजबळ यांच्या तक्रारीची दाखल घेतली नाही. शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आदेश दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहसिन पठाण करत आहेत.