विश्रामबाग पोलिसांनी नवी पेठेतील राजेंद्रनगर परिसरातून केली अटक
marathinews24.com
पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांनी नवी पेठेतील राजेंद्रनगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त करण्यात आली. मयुर सचिन भोसले (वय २०, रा. पापळ वस्ती, गणपतनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वनाज मेट्रो आगारातून वातानुकूलन साहित्य चोरी – सविस्तर बातमी
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी नवी पेठेतील राजेंद्रनगर भागात भोसले थांबला होता. भोसलेकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आशिष खरात आणि अनिस शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे दोन पिस्तुले आणि काडतुसे सापडली.
भोसले हा बेरोजगार आहे. त्याची बिबवेवाडी भागातील काहीजणांशी भांडणे झाली होती. बिबवेवाडीतील काहीजण आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती भोसलेला वाटत होती. भीतीपोटी त्याने पिस्तूल बाळगल्याची माहिती तपासात मिळाली. त्याने पिस्तूल कोणाकडून आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भोसले, जाकीर मणीयार, अर्जुन थोरात, राहुल मोरे, राहुल माळी यांनी ही कामगिरी केली.





















