गंगाधाम परिसरात अवजड वाहनांना बंदी, अवैध धंद्यावरही आणली टाच
marathinews24.com
पुणे – बेदरकार ट्रक चालकाने दुचाकीस्वार सह प्रवाशी महिलेला चिरडल्याची घटना बुधवारी (दि.११) सकाळी अकरा वाजता गंगाधाम चौकात घडली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी अपघातस्थळी भेट देऊन गंगाधाम चौकाची पाहणी केली. त्यानंतर परिसरात सकाळी ६ ते रात्री १० पिक अवर्समध्ये अवजड वाहतूक बंदीचे आदेश काढले. तर नागरिकांच्या तक्रारीनुसार परिसरातील वाईन शॉप आणि परमिट रुमवर कारवाईचा बडगा उगारला.
पिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यता – सविस्तर बातमी
महापालिका प्रशासनासोबत रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण आणि बेकायदेशीर इमारतींवर कारवाईबाबत सांगण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.
मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दीपाली युगेंद्र सोनी (वय २९) यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासरे जगदीश पन्नालाल सोनी ( वय ६१) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी ( वय ५१) याला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असून, यापक्ररणी आम्ही कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासोबतच परिसरात ताप्तुरत्या स्वरुपात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत अवजड वाहतुकीस बंदीचा आदेश दिला आहे. मात्र मार्केटयार्डमध्ये येणाऱ्या जड वाहनांच्या वेळासंदर्भातही योग्य तो निर्णय चर्चा करुन घेतला जाणार आहे. तसेच परिसरातील अवैध गोडाऊन सील करण्याची कारवाई सुरु केली आहे. जोपर्यंत संबंधित लोक इमारतीचा आराखडा दाखवत नाहीत, तोपर्यंत ते गोदाम बंद ठेवले जाणार आहेत. तसेच जी नव्याने बांधकामे सुरु आहेत, त्यासंदर्भाने रात्रीच्या वाहतूकी संदर्भात विचार विनियम करण्यास पालिकेला सांगण्यात येणार आहे. ज्या परिसरात जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, तेथे हाईट बॅरिअर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अनधिकृत इमारतीसह अतिक्रमणांवर कारवाई करा, मनपा पत्रव्यवहार करणार
गंगाधाम परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतीसह अतिक्रमणे आहेत. संबंधित सर्व ठिकाणी महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर मोठा रोष व्यक्त केला. घटनेच्या वेळी वाहतूक पोलीस इमारतीच्या आत आराम करत होते असा आरोप केला. तर अनेकदा वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी अंमलदार कोपऱ्यात उभे राहून पावत्या फाडत बसतात. येथे जड वाहतूकीस बंदीच फलक होता, तो ही काढण्यात आला आहे. ठराविक वेळत जड वाहतूकीस बंदी असताना सर्रास जड वाहने रस्त्याने धावतात. ही बाब नागरिकांनी निदर्शणास आणून दिली. यावर पोलीस आयुक्तांनी संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.
अपघातग्रस्त ट्रक मालकाचे सर्व ट्रक जप्तीचे आदेश
बेदरकारपणे ट्रक चालवून महिलेला चिरेडला प्रकरणी संबंधित ट्रकचालकाचे सर्व ट्रक जप्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून कारवाईला गती देण्यात आली आहे. दरम्यान, घरात आणलेल्या मृतदेहाला पाहून आई मला शाळेचे दफ्तर घेऊन का आली नाही, अशा प्रकारे लहान मुलीने विचारलेल्या भाबड्या प्रश्नांमुळे अनेकांना गलबलून आले.