एसटी स्टँडसह रेल्वे स्थानकावर चोरटे फोफावले
marathinews24.com
पुणे – नागरिकांनो सावधान तुम्ही जर उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी चालला असाल, तर तुमच्या ऐवजाची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पीएमपीएल बस, एसटी, रेल्वे प्रवासात तुमच्या दागदागिने आणि ऐवजाची चोरी होऊ शकते. अशा चोरट्यांच्या टोळ्या सध्या सक्रिय झाल्याचे विविध घटनांवरून दिसून आले आहे.
पुण्यात खंडणीखोरांचा उच्छाद; व्यावसायिकांना धमकावून खंडणीचे सत्र – सविस्तर बातमी
पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेकडील पिशवीतून तब्बल १ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यामध्ये दागिन्यांचा समावेश असून, भोसरी ते पुणे स्टेशन असा प्रवास करताना २९ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास चोरट्यांनी महिलेवर वॉच ठेउन चोरी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी शेगाव बुलढाणामध्ये राहणार्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची शेगावमधील असून कामानिमित्त भोसरीतील नातलगांकडे आली होती. महिला २९ एप्रिलला काम संपवून शेगावला जाण्यासाठी भोसरी ते पुणे स्टेशन असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील रोकड, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तब्बल १ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, पुणे स्टेशन परिसरात उतरल्यानंतर महिलेने बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.
बसस्थानक, रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशी रडारवर
उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त नागरिकांकडून परगावी जाण्यासाठी बसस्थानकासह रेल्वे स्थानकात धाव घेतली जात आहे. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे लुटमारीच्या घटनांवरून दिसून आले आहे. प्रामुख्याने स्वारगेट, शिवाजीनगर, खडकी एसटी स्थानकासह पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी प्रवाशांना लक्ष्य करीत लुटीचे गुन्हे केले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, प्रवाशांचे मोबाइल हिसकावणार्या टोळीला स्वागरेट पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.