नव्या दरांना शासनाची तात्काळ मंजुरी
marathinews24.com
पुणे – आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा; भत्त्यांमध्ये मोठी वाढ – राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये अनेक वर्षांनंतर लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाने नव्या दरांना मान्यता दिली असून हे दर तात्काळ अंमलात आले आहेत. वाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
निर्वाह भत्ता, आहार भत्ता आणि साहित्य खरेदी भत्त्यात वाढ करण्यात आली असून, २४ जून रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीतील महागाई लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
राज्यातील आठवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शासकीय वसतिगृहांत राहून शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भत्त्यांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. शासन निर्णय शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागवणे अधिक सुलभ होईल.
भत्त्यांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे :
निर्वाह भत्ता :
विभागीय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ₹८०० वरून ₹१५००
जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ₹६०० वरून ₹१३००
तालुका आणि ग्रामीण वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी ₹५०० वरून ₹१०००
साहित्य खरेदी भत्ता :
इयत्ता ८वी ते १०वी – ₹३२०० वरून ₹४५००
अकरावी, बारावी आणि पदविका अभ्यासक्रम – ₹४००० वरून ₹५०००
पदवी अभ्यासक्रम – ₹४५०० वरून ₹५७००
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम – ₹६००० वरून ₹८०००
आहार भत्ता :
महापालिका आणि विभागीय वसतिगृह – ₹३५०० वरून ₹५०००
जिल्हास्तरीय वसतिगृह – ₹३००० वरून ₹५०००