बंदिशीतून ईशस्तुतीचे अनोखे प्रकटीकरण
marathinews24.com
पुणे – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद सुखकंद’ या शास्त्रीय संगीताच्या सुरेल कार्यक्रमाला पुणेकर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार (दि.२७) भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) येथे झालेल्या या कार्यक्रमात ईश स्तुतीपर बंदिशींचे तसेच तराण्यांचे रसिकांना मनमोहक सादरीकरण ऐकायला मिळाले.
मानीव अभिहस्तांतरण दस्तांच्या अभिनिर्णय पूर्व तपासणी होणार – सविस्तर बातमी
‘विघ्न हरे गजानन’, ‘नीत स्मरण करे गणेश’ या बंदिशींनी मैफलीची सुरवात झाली. वगायिका मंजिरी आलेगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात निवडक बंदिशी सादर करून उपस्थित प्रेक्षकांना भावविभोर केले. त्यांना तबल्यावर अरविंद परांजपे, हार्मोनियमवर सौरव दांडेकर, तसेच गौतम हेगडे, विजेता हेगडे, स्वराली आलेगावकर यांची उत्कृष्ट साथसंगत लाभली. केतकी वैद्य यांनी कार्यक्रमाचे निवेदन करून वातावरण अधिक रंगतदार केले. गणपती, राम, कृष्ण अशा देवतांची स्तुती बंदिशीतून ऐकायला मिळाली. रागदारी आणि शब्दांचा उत्कृष्ट मिलाफ या मैफलीत होता. ‘आनंद सुखकंद’ या बंदीशीने वाहवा मिळवली.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम उपक्रमांतर्गत होणारा हा २५७ वा कार्यक्रम ठरला. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी रसिकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.या संगीतमय संध्याकाळी रसिकांनी भरभरून दाद दिली आणि कलाकारांच्या गायन व वादनाचे कौतुक केले. प्रवेश सर्वांसाठी खुला होता. विविध वयोगटातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल संगीतयात्रेचा आनंद घेतला.



















