नवऱ्याची सुपारी देणे, प्रियकरासोबत बस्तान बांधणे, मारेकरी धाडण्याचे प्रकार वाढले
Marathinews24.com
पुणे – विवाहबाह्य अनैतिक संबंधासह प्रेमाच्या त्रिकोणातून संसाराची राखरांगोळी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रामुख्याने थेट नवर्याची सुपारी देणे, प्रियकराच्या मदतीने पतीवर हल्ला चढविणे, अपंग करण्यासाठी मारेकरी धाडणे, जन्मलेले अपत्य आपले नसल्याच्या संशयातून त्याचा बळी घेणे, होणारा नवरा आवडत नसल्यामुळे थेट सुपारी देण्याच्या घटनांमुळे कौटुंबिक कलहात भर पडली आहे. महिन्याभरात पुण्यासह ग्रामीण भागातील घडलेल्या घटनांमुळे नात्यांतील दुरावा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून आले आहे.
नागरिकांकडून सोशल मीडियाचा वाढता वापर कौटुंबिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकसह नानाविध अॅपच्या माध्यमातून काहीजणांचा एकमेकांतील संवाद पातळीपेक्षा खालच्या दर्जावर पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली मोकळीक, घरातील दबावाचे वातावरण, कौटुंबिक अडचणींचा करावा लागणारा सामना अनेक जोडप्यांमध्ये आपसूकपणे विवाहबाह्य संबंधाकडे ढकलत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थेट खून, खूनाचा प्रयत्न, हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकून काही जोडप्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे संबंधितांच्या चिमुरड्यांच्या एकटेपणा, एकलकोंडेपणा वाढला आहे. त्याचत समाजाकडून मिळणारी वागणूक, मित्र-मैत्रिणींमध्ये होणारी चेष्टा-मस्करी पीडित मुलांना विमनस्क अवस्थेकडे झुकवत आहे.
धक्कादायक : जमीन कसणार्याने सोन्यासाठी मालकाचा केला निर्घृण खून -सविस्तर बातमी
लग्नानंतर पती वेळच देत नसल्याची कुरबुर, कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी कोणीही नाही. मुला-मुलींचा सांभाळ करण्यावरून होणारे वाद, आर्थिंक समस्या, आयटी कंपनीत काम करणार्या दांम्पत्यामध्ये कमविण्यातून निर्माण होणारा अहंभाव, सास-सासर्यांचा सुसंवादाचा अभाव यासह अनेक कारणांतून दाम्पत्यामध्ये वादविवादाला सुरूवात होते. त्यातच दिवसरात्र सोशल मीडियाच्या वापरातून होणारी अनोखळी लोकांसोबत ओळख नात्यांमध्ये मीठाचा खडा टाकत असल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे. आकर्षण, वेळ, पैसा, कुटूंबाची जबाबदारी टाळणे, दबाव झुगारुन टाकण्यासाठी पती अथवा पतीने विवाहबाह्य संबंधाना मुकसंमंती दिली आहे. दरम्यान, काही महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आपल्या रस्त्यातील काटा दुर करण्यासाठी थेट संसारावर वरंवटा फिरविला जात आहे.
अनैतिक संबंधातून झालेले खून अन हल्ले
अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात नुकतीच घडली आहे. रविंद्र काळभोर (वय ४५) असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी पत्नी शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) आणि प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर ( वय ४१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. शोभा आणि आरोपी प्रियकर गोरख या दोघांमध्ये मागील ५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. अनैतिक प्रेमसंबंधबाबत रविंद्रला समजल्यामुळे पत्नीने प्रियकर गोरखच्या मदतीने संपविले.
दुसर्या घटनेत तरूणीने चक्क होणार्या नवर्याची टोळक्याला सुपारी देत खुनी हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक घटना २७ फेबु्रवारीला कासुर्डी ता. दौंड गावच्या हद्दीत घडली. कुटूंबियांनी लग्नासाठी निवडलेला मुलगाच आवडला नसल्यामुळे तरूणीने त्याला मारण्याची दीड लाखांची सुपारी दिली होती. आरोपींना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी तरूणी मात्र पसार असून, तिचाही शोध घेतला जात आहे. आदित्य शंकर दांगडे (वय १९, रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा ) संदीप दादा गावडे (वय ४०) शिवाजी रामदास जरे (वय ३२ ) इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७ दोघेही रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) सुरज दिगंबर जाधव (वय ३६ रा. काष्टी, श्रीगोंदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयूरी सुनील दांगडे (रा. श्रीगोंदा) पसार आहे. सागर जयसिंग कदम (वय २८ रा. माहिजळगाव ता. कर्जत, अहिल्यानगर) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आयटी इंजिनिअरने साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा चिरला
पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून ठार केल्याची घटना चंदननगर परिसरात उघडकीस आली आहे. आरोपी बापच मुलाला घेऊन बेपत्ता झाला होता. त्याने मुलाचा खून केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे उघडकीस आले. हिम्मत टीकेटी (वय ३ वर्ष ६ महिने, रा हडपसर) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी माधव टीकेटी (वय ३२, रा. हडपसर) याला अटक केली.
पतीच्या खुनाची पत्नीनेच दिली होती सुपारी
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या खून प्रकरणात मामीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. घराशेजारी राहणार्या तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधासह नवर्याच्या जाचाला कंटाळून तिने ५ लाखाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. मोहिनी सतीश वाघ (वय ५३, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सतीश तात्याबा वाघ (५८, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) असे खून केलेल्याचे नाव आहे. आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय ३० रा. शांतीनगर, धुळे ) नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२ रा. अनुसया पार्क, वाघोली) अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे अशी अटक केलेल्याची नावे आहेत.