महोत्सव आपटे रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे २ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुला
marathinews24.com
पुणे – पुणे पुस्तक जत्रा व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित तेविसाव्या पुणे पुस्तक महोत्सव व मराठी साहित्य मेळ्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. या महोत्सवात विविध नामांकित प्रकाशन संस्थांचे तसेच शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचाही या पुस्तक जत्रेत विशेष सहभाग असून, ‘सूर्यदत्त’च्या वतीने प्रत्येकाला मोफत पुस्तक दिले जात आहे. हा महोत्सव आपटे रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे २ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, साहित्यिक शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा आकर्षक स्टॉल विशेष लक्षवेधी ठरत आहे. या स्टॉलला विद्यार्थी, पालक आणि पुस्तकप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या आणि शैक्षणिक वर्ष २०२४–२५ दहावी आणि बारावीमध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्णपदक आणि पुस्तक भेट देऊन गौरविण्यात येईल.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “ज्ञानाचा सागर असलेल्या या पुस्तक महोत्सवाला सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य भेट द्यावी. पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचारविश्व आणि अनुभवविश्व अधिक समृद्ध करावे. पुणे पुस्तक महोत्सव हा वाचनसंस्कृतीला चालना देणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.”





















