शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दादअतुल खांडेकर, सचिन इंगळे, प्रज्ञा देशपांडे यांनी सादर केल्या संतरचना
marathinews24.com
पुणे : पुण्यनगरीत ‘अवघे गर्जे पंढरपूर’चा गजर – ‘नको देवराया अंत आता पाहू’, ‘अवचिता परिमळू’, ‘घनु वाजे घुन घुणा’, ‘आहा रे सावळीया’ अशा भक्तीरचनांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. निमित्त होते आषाढी एकादशीचे औचित्य साधून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे! प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर, प्रज्ञा देशपांडे, सचिन इंगळे यांनी संत रचना आणि भक्ती रचना सादर केल्या.
स्वरांच्या पालखीत सजली संत रचनांची मांदियाळी – सविस्तर बातमी
कार्यक्रमाची सुरुवात होनाजी बाळा यांनी रचलेल्या ‘घन:श्याम सुंदरा’ या भूपाळीने झाली. विश्वाला सांभाळणाऱ्या मायभवानीला आर्त हाक घालताना प्रज्ञा देशपांडे यांनी ‘माय भवानी तुझे लेकरू’ ही भक्तीरचना भावपूर्णतेने सादर केली. विश्वात्मकतेचा विचार करून सकलसंतांनी विश्वाचा संसार सुखाचा व्हावा, अशी परमेश्वराकडे केलेली याचना दर्शविणारी ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ ही भक्तीरचना अतुल खांडेकर यांनी प्रभावीपणे सादर केली. परमेश्वराची विश्वात्मकता दर्शविणारी यशवंत देव यांची ‘कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे’ ही रचना सचिन इंगळे यांनी सादर केली.
‘अवचिता परिमळू’ ही संत ज्ञानेश्वर महाराज यांची विरहिणी, ‘आहा रे सावळीया, कैसी वाजविली मुरली’ ही संत एकनाथ महाराज यांची गवळण तर संत कान्होपात्र रचित ‘नको देवराया अंत आता पाहू’ यांसह ‘भावनांचा तु भुकेला’, ‘पैल तो गे काऊ’, ‘माई मैने गोविंद लिनो मोल’, ‘येरे येरे माझ्या रामा’ अशा वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात आल्या. ‘अच्युता अनंता श्रीधरा माधवा’ या संत सोयराबाई रचित भैरविने अतुल खांडेकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
राजेंद्र दूरकर, केदार मोरे, नितीन जाधव, अमृता ठाकूरदेसाई-दिवेकर, निलेश देशपांडे यांनी समर्पक साथसंगत केली तर रवींद्र खरे यांनी संत साहित्यातील विविध दाखले देत निरूपणातून कार्यक्रम फुलवत नेला. संगीत संयोजन सचिन इंगळे यांनी केले.
प्रास्ताविकात नमोल लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती सांगितली.