भावस्पर्शी संगीत मैफल संपन्न
marathinews24.com
पुणे – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीराम दिंडी’ या भक्तिरचनांच्या कार्यक्रमाने शनिवारी, ११ ऑक्टोबरला सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात रसिक प्रेक्षकांना भक्तिरसाने ओथंबून टाकले. प्रभु श्रीरामांना समर्पित या मैफिलीत भजन, रचना आणि सुरांच्या माध्यमातून भक्तीचा सुंदर अनुभव रसिकांनी घेतला.या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका डॉ. रेवा नातू आणि गौरी पाठारे यांनी आपल्या सुमधुर गायकीने भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण केले.
जीवनाकडे बघण्याचा वस्तुपाठ कलेतून मिळतो : कृष्णकुमार गोयल – सविस्तर बातमी
डॉ. रेवा नातू यांनी ‘ध्यान लागले रामाचे’, ‘तुम उठो सिया’, ‘राम रंगी रंगले’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ही भावस्पर्शी भजने सादर करून सभागृहात भक्तिभावाची भावना निर्माण केली. गौरी पाठारे यांनी ‘श्रीरामचंद्र कृपालु भजमन’, ‘राम का गुणगान करिये’, ‘सिया संग झूले बागीयान में’ आणि ‘पायोजी मैंने’ या रचनांद्वारे कार्यक्रमात भक्तिरसाची अधिक रंगत आणली.या सादरीकरणांना संवादिनीवर सुरेल साथ दिली सुप्रिया जोशी यांनी, तबल्यावर साथ दिली पुष्कराज जोशी यांनी, टाळवादनाने भक्तिरंग खुलवला स्वाती करंदीकर यांनी आणि पखवाजवर सुंदर साथ केली सिद्धेश्वर उंडाळकर यांनी.सूत्रसंचालन अनुश्री नातू यांनी केले. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे मनापासून कौतुक केले.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांच्या मालिकेतील हा २५९ वा कार्यक्रम ठरला. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.




















