जिल्ह्यासह शहरातील घटनेने नागरिकांमध्ये धास्ती
marathinews24.com
पुणे – शहरासह जिल्ह्यातील महिला व मुलींच्या अपहरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जातीय तणावही वाढत अलल्यामुळे चिंतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेसंदर्भात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. त्यासोबतच कायदा-सुव्यस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार्यांनाही जागीच धडा शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेणार्या मुलींमधील भीती कमी होउन धाडस निर्माण होण्यास मदत होणार आहे. वाढलेल्या खुनशी वृत्तीला पोलिसांनी वेळीच आवर घालणे अत्यावश्यक आहे. नाहीतर बिहार, उत्तर प्रदेश राज्यासारखी कायदा सुव्यवस्थेची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला – सविस्तर बातमी
कौटुंबिक आर्थिंक गरजा भागवण्यासह नोकरी, शिक्षण घेण्यासाठी बहुतांश महिला-मुलींना घरापासून दूरवर प्रवास करावा लागतो. त्यावेळेस काही जणांकडून जाणीवपुर्व्रक महिला-मुलींचा पाठलाग करणे, टोमणेबाजी करणे, अश्लील शेरेबाजी नित्याचेच बनले आहे. अशाही स्थितीत परिस्थितीचा विचार करीत बहुतांश महिला घटनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे टवाळखोरांचे फावले असून, त्यांची हिम्मत वाढत चालली आहे. त्यानंतर थेट साथीदारांच्या मदतीने महिलांचे अपहरण, खुनाचा प्रयत्न, अत्याचारासारखे गंभीर प्रकारही घडत आहेत. त्यामुळे पुढारलेल्या शहरासह नावाजलेल्या पुणे जिल्ह्यात आजही मुली-महिलांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील कात्रजला जाण्यासाठी महिलेने शेअरिंग रिक्षा असल्याचे समजून रिक्षा चालकाला थांबवले. मात्र, त्यावेळी आधीपासून रिक्षात मद्यधुंद असलेल्या आरोपींना तिला ओळखता आले नाही. आरोपींनी तिला इच्छितस्थळी सोडण्यासाठी शॉटकट्सचा बहाणा केला. त्यानंतर आरोपींनी तिला थेट कात्रजमधील मांगडेवाडीतील डोंगरात नेले. त्यानंतर चुकीच्या जागी आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने त्यांच्याशी वादविवाद केला. मात्र, नशेत धुंंद असलेल्या आरोपींनी तिला मारहाण करून थेट खाणीत ढकलून देउन तिचा खून केला. ही घटना १० फेबु्रवारीला घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ आरोपींना अटक केली. कमलेश चौधरी सोनू लक्ष्मण पवार, अब्दुल मोहंमद शेख, महादेव अर्जुन व्होरडे, साई अमित पुजारी, सोहेल हनिफ खान यांना अटक केली आहे.
जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये कुटूंबियासह खरेदीसाठी आलेल्या तरूणीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून दोघा भावडांनी तिचे फिल्मी स्टाईल अपहरण केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१७ ) भरदिवसा चार वाजण्याच्या सुमारास घडल्यामुळ खळबळ उडाली आहे. दुचाकीस्वार कुटूंबियाला आरोपींनी अडवून तरूणीसह तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळयात मिरचीपूड फेकली. झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (दोघे रा. शेख वस्ती, स्वामी िंचचोली, ता. दौंड ) या सख्ख्या भावांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तरूणीचा विवाह अगदी तोंडावर आला असताना तिच्या अपहरणामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पुणे-सोलापूर महामार्ग अडवून टायर जाळत आंदोलनही केले. दरम्यान, उच्चशिक्षित तरूणीसह कुटूंबियावर दिवसाढवळ्या अशारितीने हल्ला करीत आरोपींनी दहशत माजवली. त्यामुळे त्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे, अपहरण करण्याआधी कोणासोबत संपर्क केले, याचा तपास करून ठोस कारवाईच मागणी आंदोलकांनी केली.
पुण्यात इंजिनिअर तरूणीचे अपहरण करून हत्या
विमाननगर परिसरातून अपहरण केलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याची घटना एप्रिल २०२४ मध्ये घडली होती. अभियांत्रिकी शाखेत शिकणार्या मित्राने साथीदारांच्या मदतीने तरूणीचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर तिचा मृतदेह सुपे गावाजवळ पुरला होता. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२ ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव, सुरेश इंदुरे यांना अटक केली होती. मुलीची सुखरुप सुटका करण्यासाठी आरोपींनी तातडीने ९ लाख रुपये द्या. अन्यथा मुलीचे बरेवाईट करू, असा मेसेज आरोपींनी तिच्या वडिलांना करीत तरूणीचा खून केला होता.
तरूणींनो वेळीच सावध व्हा, चुकीला दाखवून द्या
शाळा-महाविद्यालय, नोकरी, प्रवासादरम्यान कोणी तुम्हाला सातत्याने त्रास देत असल्यास मुलींनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. संबंधित प्रकाराची माहिती कुटूंबियासह पोलिसांना देणे गरजेचे आहे. अशा घटना वेळीच थोपवण्यसाठी महिला-मुलींनी व्यक्त होणे महत्वाचे आहे. तरच टवाळखोरांच्या हिंमतीला आळा बसणार आहे. नाहीतर वेळ निघून गेल्यास तुमच्यासह कुटूंबियावर पश्चातापाची वेळ येणार आहे.
























