आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच रा.स्व.संघाचे काम- सरसंघचालक मोहन भागवत

‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ चरित्रग्रंथ प्रकाशन

marathinews24.com

पुणे – जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे. ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. तोच समाजाचा स्थायी भाव आहे. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. माणूस आपलेपणाकडे झुकला तर देवरुप होतो. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांती सेवा, परोपकाराचे कार्य करणारे आदर्श समाजात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन – सविस्तर बातमी

आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या उत्तुंग जीवनकार्याच्या आढावा घेणा-या ‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार, वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, डॉ. राजीव ढेरे आदी उपस्थित होते. तसेच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोहन भागवत म्हणाले, महापुरूषांच्या वाटेने जायला सामान्य माणूस कचरतो. मात्र, आपलेपणाची वाट चोखाळणाऱ्या माणसांना तो आप्त समजतो. या आपलेपणानेच सर्वांचे जीवन उजळून निघावे, त्यासाठी कर्तृ्त्व खर्च करून स्वतःचेही जीवन उजळून टाकण्याची प्रेरणा समाजाला पुढे नेते. त्यातूनच समाजाचे परिवर्तन घडते, असा विश्वास डॉ. भागवत यांनी व्यक्त केला.

डॉ. शां.ब.मुजुमदार म्हणाले, रा.स्व. संघ हा दादा खडीवाले यांचा श्वास व ध्यास होता. आयुष्यात त्यांनी जनकल्याण रक्तपेढीसह जे अनेक सामाजिक व विविध प्रकल्प केले, त्यामागे रा. स्व. संघाची प्रेरणा होती. संघाचे शताब्दी वर्ष आणि दादांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन हा देखील योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.

विनायक खडीवाले म्हणाले, आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन यांसह जनकल्याण रक्तपेढी, जनकल्याण नेत्रपेढी, हरी परशुराम औषधालय कारखाना व दवाखाना, निराधार मुलांकरता आधार केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये औषधी वनस्पती उद्यान उभारणी, निराधार महिलांकरता वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांची उभारणी दादांनी केली आहे. त्यांनी आयुर्वेद व रा. स्व. संघाविषयी च्या १०० च्या पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. विविध क्षेत्रात दादांचे मोठे कार्य आहे. ते यामाध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.

संगीता विनायक वैद्य खडीवाले म्हणाल्या, बीड सह पुणे जिल्ह्यामध्ये विविध १२५ ठिकाणी दादांनी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून १ लाखाहून अधिक रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्याच्या पुढे देवबांध या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्व डोंगर हिरवे करण्यासाठी दादांनी मोहीम हाती घेतली होती. याशिवाय वैद्य ग्रंथ भांडार, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार, आयुर्वेद प्रचारक व हिंदू तनमन, विश्व वैद्य संमेलने, अन्नकोट प्रदर्शने असे अनेक उपक्रम देखील दादांनी राबवले. मनपा कोटणीस दवाखान्यात एचआयव्ही एड्स करीता ३० वर्षे त्यांनी मोफत रुग्णसेवा दिली. तब्बल ४० वर्षे त्यांनी गुरुकुल पद्धतीने विनामूल्य आयुर्वेद प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यांच्या कार्याची महती सांगणारा हा चरित्रग्रंथ ३२० पानांचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

रोहित जोगळेकर आणि वैद्य अनंत निमकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ग्रंथनिर्मितीमध्ये मोलाचा सहभाग असलेल्या तनुजा राहणे आणि गिरीश दात्ये यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. वैद्य शुभंकर कुलकर्णी आणि वैद्य आशुतोष जातेगावकर यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजीव ढेरे यांनी आभार मानले.

पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात आयुर्वेदाचे विद्यापीठ नाही : डॉ. शां.ब.मुजुमदार

आयुर्वेद शास्त्रात पुणे हे नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. आयुर्वेदाचे अनेक जाणकार आणि ज्यांनी आयुर्वेदासाठी आयुष्य वेचले, अशा दिग्गज व्यक्ती पुण्यात आहेत. पुण्यात आजमितीस ३० विद्यापीठे आहेत. आयुर्वेद शास्त्राची ही मोठी परंपरा पुण्यात असूनही पुण्यातच काय महाराष्ट्रात आयुर्वेदासाठी विद्यापीठ नाही, अशी खंत डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राजस्थान आणि गुजरात मध्ये मात्र विद्यापीठ आहे. पुण्यामध्ये आयुर्वेद विद्यापीठाची नितांत आवश्यकता असून रा.स्व. संघाच्या शताब्दी निमित्त पुण्यात आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी मोहन भागवत यांच्याकडे व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top