वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 चे उद्घाटन
marathinews24.com
मुंबई – महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत. या व्हेव्ज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असून, आता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत,असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व जगाला भारताच्या नव्या ‘क्रिएटिव्ह व्हेव्ज’चे स्वागत करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.




















