किसान सभेचे अजित नवले यांचा धरणग्रस्तांच्या संघर्षाला पाठिंबा
marathinews24.com
ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुंबई आणि इतर महानगरे यांच्या पिण्याच्या पाण्याकरिता “काळू नदीवर” प्रस्तावित करण्यात आलेला काळू नदी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याची कुणकुण लागताच तसेच गत महाराष्ट्रदिनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा मुख्यालयात बोलताना सुतोवाच केलेल्या काळू धरणाच्या भूसंपादन व पुनर्वसन या बाबींकरिता एमएमआरडी एच्या माध्यमातून ४५० कोटी रुपये कोकण पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कातील ५७ जणांची एटीएसकडून चौकशी – सविस्तर बातमी
काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था व शाई धरण संघर्ष समितीच्यावतीने प्रशांत सरखोत यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर दि.१३ मे रोजी काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ शेतकरी नेते तथा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी काळू धरण विरोधी संघर्ष समिती यांनी केलेल्या संघर्षाचे कौतुक करून पुढील काळात काळू नदी क्षेत्रातील शेतकरी व कष्टकरी यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन नवले यांनी दिले आहे. प्रस्तावित धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील रहिवासी व शेतकरी यांच्यावर सरकार जर दडपशाही करून अन्याय करीत असेल तर किसान सभा स्वतः या लढ्यात स्थानिकांच्या सोबत उतरेल असे डॉ.नवले यांनी बोलताना म्हटले आहे.
तर अनेक वर्षापासून निधीविना दुरुस्तीसाठी रखडलेल्या मौजे तळेगाव येथील शिरसोणवाडी धरण ते मौजे चासोळे येथे प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा बांध असा कृती समितीने आयोजित केलेल्या “आक्रोश मोर्चाला” उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे डॉ. नवले यांनी कबूल केले असल्याचे काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे सह- अध्यक्ष पोपटराव देशमुख यांनी सांगितले.याप्रसंगी काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संभाजी फनाडे,उपाध्यक्ष सय्यद शेख,कार्याध्यक्ष गणेश देशमुख,चिटणीस विलास पठारे, सह-सचिव कैलास निमसे, कोषाध्यक्ष संताजी देशमुख , सह-कोशाध्यक्ष रोशन चौधरी ,युवा शेतकरी प्रतिनिधी प्रविण देशमुख इत्यादी उपस्थित होते.






















