पोलिसांनी सापळा लावून केली अटक
marathinews24.com
पुणे – मित्राची वाट पाहत थांबलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल लुटणाऱ्या चोरट्यांना वारजे पोलिसांनी अटक केली. श्रीकांत विनानाथ मारणे (वय ३१), भूषण सुरेश पोमेंडकर (वय २०, दोघे रा. केळेवाडी, कोथरूड), अक्षय प्रदीप यादव (वय ३०, रा. सागर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ७ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुण कोथरूड भागात राहायला आहे. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास तक्रारदार तरुण मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील डुक्करखिंडीत मित्राची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी आरोपी मारणे, पोमेंडकर, यादव आणि साथीदार हे दुचाकीवरुन तेथे आले. बाह्यवळण मार्गावर थांबलेल्या मारहाण करुन त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड, मोबाइल संच असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी पसार झाले.
घाबरलेल्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणाने दिलेल्या चोरट्यांच्या वर्णनानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा लावून मारणे, पोमेंडकर, यादव यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करत आहेत.
मार्केट यार्ड भागात सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरी
पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना.मार्केटयार्ड भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक तरुणाचे काका मार्केट यार्डातील गंगाधाम परिसरात राहायला आहेत. त्यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीिक्षक साैरभ माने तपास करत आहेत.
हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार वणवे तपास करत आहेत.



















